Saturday, 23 May 2015

कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २)



ट्रिप प्लान करायला सुरु केलं तेव्हाच "ट्रीप अॅड्व्हायझर" ला शरण गेले होते. खुप शोधाशोध केल्यावर एक निश्चित समजलं, ते म्हणजे आपलं भयंकर कन्फ्युजन झालेलं आहे. ३ गेट्स पैकी  कोणतं गेट निवडावं? कोणता झोन चांगला? सफारी म्हणजे काय? एका गेट हुन दुसर्‍या गेटला जायला म्हणे १ तास लागतो, मग हॉटेलमधुन एका गेट्वरुन दुसर्‍या भलत्याच गेटवर सकाळी ६ ला पोहचायचं कसं? असे एक ना दोन, हजार प्रश्न पडले..

म्हणलं मारो गोली.. जे हॉटेल बेस्ट,त्याच्या जवळचा झोन बेस्ट..म्हणुन चांगल्या हॉटेलवर लक्ष केंद्रित केलं. [१]


एम्.पी टुरीझमची कान्हा मधली हॉटेल्स [२] म्हणे अगदी जंगलात आहेत. पण अर्थातच त्यांचे दर सुद्धा तेवढेच भारी आहेत. शिवाय दिवाळीमुळे त्यांनी काही % ने सरसकट रेट्स वाढवले होतेच. आणि ह्यावर टॅक्स..त्यामुळे त्याच्या नादी लागणे शक्य नव्हतं.

मुबा हे नाव कायम लिस्ट मध्ये [३] सगळ्यात वर सापडायचं.म्हणुन मग त्यांना आणि इतर ४-५ हॉटेल्सना मेल टाकुन ठेवला. सगळीकडे साधारण रेट्स सारखेच होते.पण मुबाची मज्जा म्हणजे तिथे "मडहाऊस" होतं. ज्यात ४ माणसं राहु शकत होती. आणि किंमत मात्र साधारण बाकी खोल्यां एवढीच (ज्यात २ माणसं राहु शकतात). मग काय २ मडहाऊन बुक करुन टाकले. आणि लगेच घरी जाऊन "आपण जंगलात चाललोय..उगा भारी हॉटेल सारख्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत. उलट साधेपणानी रहाण्यात जास्त मजाय. जंगलात जाऊन झोपडीत राहु.. कसलं भारी" असं ब्रेन वॉशिंग सुरु केलं.

मुबाला मी पहिला कॉल केला ते ऑनलाईन बुकिंग कसं करावं म्हणुन. मी बुकिंग करत असताना इतके प्रश्न फॉर्ममध्ये दिसल्यावर मी जरा गांगरुन गेले होते. शिवाय सिझन मध्ये सफारी हवी असल्याने काही तासातच सफारी संपत आल्या.
म्हणुन मी गडबडीने मुबाच्या - जुनैदला कॉल केला. तो भला माणुस रेल्वे मध्ये होता, तरी त्यानी मला डीटेल मध्ये सर्व काही सांगितले. मी जर त्या दिवशी बुकिंग नसतं केले तर मला सगळाच प्लान गुंडाळावा लागला असता कारण दुसर्‍या दिवशी अजुन एखादी सफारी बुक करावी म्हणुन मी साईट वर गेले तर सर्व काही सोल्ड आउट.. [४]

पुढे मी जुनैदला १०० तरी कॉल केले.. हवामान कसय.. रस्ते कसेत..जबलपुरला कसं जाऊ.. लहान मुलांना खायला आहे का तुमच्याकडे.. तुमचं स्वयंपाकघर वापरू द्याल का????
प्रत्येक वेळेस त्यानी मला सविस्तर उत्तरं दिली आणि दर वेळी शेवटी हे आवर्जुन म्हणाला की "तुम्ही या तर.. तुम्हाला अगदी घरात असल्या सारखं वाटेल.. मुलांची काळजी करु नका.." ह्यातला शब्द न शब्द खरा झाला...

पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे आम्ही पुण्यातुन निघालो.नागपुरात पोहोचल्यावर गाडी (विदाऊट कॅरिअर!!) हजर होतीच.. काय वाट्टेल ते केलं तरी एवढं सामान आणि माणसं ८-१० तास आत कोंबता येणार नाहीत हे कळुन चुकलं. (लोकांनी घरदार कान्हाला पर्मनंट शिफ्ट करत असल्या सारखं सामान घेतलं होतं). आधी गाडी शहरात नेऊन कॅरिअर लावुन आणणे भाग होते. तोवर गपगुमान मराठी माणसं नागपुरात पंजाबी जेवण जेवली. (ते सगळी कडे मिळतं). गाडी आली. क्वालिस मध्ये ड्रायव्हर सकट ९ जण कोंबले.पोरांना अंगाखांद्यावर नाचवत (कारण बाकी कुठेच जागा नव्हती) आणि माणशी १ अशा १० बॅगा क्वालिसच्या डोक्यावर बांधुन नागपुर मधुन आमची वरात दुपारी ४ ला निघाली.

१० व्या मिनिटाला लोक्स पश्चातपाच्या आगीत आणि नागपुरी उकाड्यात होरपळुन निघाले. काय ते रस्ते.. अहाहा!! पुढचे अखंड १० तास आम्ही घसळुन घुसळुन निघालो.. मध्यप्रदेश तर सुड आहे नुसता सुड.. अत्यंत दळभद्री रस्ते, रहदारी फारशी नाहीच्..दुकानं, हॉटेल सोडा चहाची टपरी पण दिसेना.. रात्र झालेली.. अधुन मधुन काही घरं दिसायची.. तिथे मात्र दिवाळीची जोरदार रोषणाई केलेली. प्रत्येक घरा समोर शेणाचं काही तरी बनवुन त्याची पुजा केलेली.




आम्ही मात्र हे काही एंजॉय करण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतो. सोबत घेतलेला निम्मा फराळ संपवलेला. अबीरनी रडुन रडुन गोंधळ घातलेला. सगळे जण मोठे गाव म्हणुन बालाघाटची वाट पहात होते. पण तिथे पोहचल्यावरही सगळे काही बंद झालेले. रात्रीचे ९.३० झालेले पण सगळीकडे सामसुम.. कसंबसं एक हॉटेल शोधलं, वरण भात मिळवला आणि पोरांना खाऊ घातला.. झालं आता फार तर १-२ तास आणि पोहचुच आपण अशी मनाची समजुत घालत डोळे मिटुन घेतले..

..अचानक खाडकन डोळे उघडले.. गेले मागचे १७ वर्ष गाडी अंधार्या, खडबडीत रस्त्यांवर पळतेच आहे असं फिलिंग आलं.. पोरं कधीच झोपुन गेली होती..पाय बधीर झालेले..सगळे झोपलेले..बाबा, नवरा, दादा आणि (मुख्य म्हणजे) डायवरकाका फक्त जागे होते आणि माझ्याकडे खाऊ की गिळु नजरेनी पहात होते.जंगलातुन गाडी जातच होती.. जातच होती..पण हॉटेल सोडा, साधं कुत्र पण दिसेना.. 

मी चुकुन विचारलं..."किती वाजले? " (विनाशकाले विपरीत बुद्धी...)

दादानी मोठठा सुस्कारा सोडुन सांगितलं..."एक.."

"काय???? एक?????" अज्ञानाच्या सुखात झोपी गेलेले टक्क जागे झाले...नशीब पोरांना अजुन आपण गाडीतच आहोत हे झोपेत असल्यामुळे समजलं नव्हतं..

परत मुबाला कॉल लावला..दादा म्हणे "सांग त्यांना.. अजुन १० मिनिटांनी आता हिमालय सुरु होईल.." बस्स..तेवढंच पुरेसं होतं..लोक्स वेडेच झाले..अक्षरशः डोळ्यातुन घळाघळा पाणी येइस्तोवर हसायला लागले.. (ह्याला म्हणतात अति झालं न हसु आलं..)आम्हाला दुनियेतली सगळी हॉटेल्स दिसु लागली पण मुबा दिसेना..बर्‍याच गोंधळातुन शेवटी एकदाचं मुबा आलं..म्हणजे एक मोठं गेट ,एक गोठा आणि एक वॉचमनची रुम दिसली..! गेट मधुन आता गेलो की परत जंगल सुरू, हॉटेल बिटेल कुछ नही..

"आता हे आत गेल्यावर पुरूषांना खोल्या सारवायला आणि बायकांना भाकर्‍या बडवायला घ्या म्हणणार" गोठा आणि एकंदरीत रागरंग पाहुन आईनी अंदाज बांधला.. 

पुन्हा भुकेले, पेंगुळलेले, पहाटे ४ पासुन प्रवासात असलेले, वैतागलेले लोक धो धो हसायला लागले..

काही कळत नव्हतं काय चाललय.. लोक वेड लागल्या सारखे हसत होते.. रात्रीचे २ वाजत आलेले..नुसतीच गाडी आत आली..पण अंधारात काही कळेना..शेवटी गाडी एका कमानीपाशी थांबली. काही लोक आमच्या साठी उभे होते.  

आत गेलो..पहिला धक्का.. मुबा हे नुसते हॉटेल नसुन एक मिनी जंगल आहे.. आत छोटा ओढा लागतो.. त्यावर छोटे छोटे पुल आहेत.. दाट झाडं आहेत.. गवतीचहाची पुरुषभर उंचीची झाडं सगळी कडे लावली आहेत.. वर काळकुट्ट आकाश.. आकाशाचा खरा रंग असा असतो हे मला पहिल्यांदा कळालं.. डब्यातली साखर सांडावी तसे तारे सांड्ले होते अक्षरशः..

हे मुबाचे पहीले दर्शन..







मला थोडं बरं वाटलं.. म्हणलं खरच हे हॉटेल बेक्कार निघालं असतं तर माझी खैर नव्हती.. तरी मडहाऊस कसं असेल ह्याची धाकधुक होतीच.. हे मडहाऊस.. 



आणि हा त्या समोरचा मुख्य हॉटेल कडे जाण्याचा रस्ता..



मडहाऊस चक्क अप्रतीम निघालं. बाहेरुन मातीनी सारवलेलं पण आतुन अटॅच बाथरुम, दगडी बांधकाम असणारं, कन्सिल्ड वायरंगचं, कंदिलामध्ये बल्ब लावुन झोपडीचा फील देणारं, अंगण आणि तुळशी व्रुदांवनाचं, बाकी हॉटेलपेक्षा थोडसं बाजुला, हॉटेलमधुन येताना छोटासा ओढा आणि त्यावरचा पुल ओलांडुन याव लागेल असं.. मडहाऊस..!!

रचना गावतल्या घरा सारखी पण सुविधा सगळ्या..मोठे बेड आणि स्वच्छ ब्लॅकेट्स.. थुई थुई नाचुन घेतलं..जंगलात असल्या घरात रहायचं म्हणजे स्वर्गच हो..

मुबा ही ५५ एकर वरील प्रॉपर्टी आहे. इथे सफारी व्यतिरिक्त तुम्ही खुप काही करु शकता. जंगल ट्रेल म्हणुन आजुबाजुच्या जंगलात (जे कोअर जंगलात येत नाही) फिरु शकता. जवळच एक छोटेसे तळे आहे..शेकोटीसाठि सारवुन घेतलेली खास जागा आहे.. एका रुम मध्ये खेळण्यासाठी टेबल टेनिस आणि बिलिअर्ड आहे..

पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे इथले अत्यंत रुचकर जेवण.. तुम्ही इथे जेवणाच्या वेळेची अक्षरशः वाट पहाता. जंगलात असल्याने इथे मर्यादित गोष्टी मिळतात. आणि जबलपुर जवळ असल्याने जेवणात बटाटा असतोच असतो. पण मसालेच इतके फ्रेश घालतात की सकाळ संध्याकाळ जरी बटाटा दिला तरी काही फरक पडणार नाही. हे खरय की जेवणाचा पॅटर्न एकच आहे त्यामुळे ४ दिवस कुणा कुणाला कंटाळा येउ शकतो. पण मुळात तुम्ही कुठे आहात याच जरासं भान ठेवलं की तुम्हाला जंगल जास्त अनुभवता येतं. काही लोकांना जंगलाच्या नीरव शांतते पेक्षा जोर जोरात गाणी लावणे, गप्पा मारणे जास्त आनंददायी वाटत होते. त्यांना जेवणातही मोठ्या हॉटेल सारखा पंजाबी मेन्यु हवा होता. आम्हाला इतक्या सुंदर जंगलात कुणी इतक्या प्रेमानी चविष्ट, गरम गरम आणि ताजं जेवण खाऊ घालतय ह्यात आनंद होता..  एक तर जंगलातली गुलाबी थंडी, मोकळी स्वच्छ हवा, मोबाईलचे नेटवर्क नाही की टिव्ही नाही, भल्या पहाटे उठुन रात्री लवकर दमुन झोपणे यामुळे की काय, पण सगळच सुंदर वाटत होतं..

असाच एकदा रंगलेला सारीपाटाचा डाव



मुबाची खरी श्रीमंती आहेत इथली माणसं.. १-२ गोष्टी इकडे तिकडे झाल्याही असतील, पण ह्या माणसांनी आम्हाला ते जाणवु दिलच नाही.ती भली माणसं रात्री २ पर्यंत आमच्या साठी जागली, नुसतीच नाही जागली.. गरम गरम जेवणं वाढण्यासाठी जागली..आम्ही फक्त जेवण ठेवा एवढच संगितलं होतं. ते गरम असेल आणि ताटात वाढुन मिळेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे  सुखावुन चार घास जास्त जेवलो.आपल्याला झोपण्यासाठी रात्री २ ही वेळ नक्कीच विषेश नाही, पण ही माणसं सकाळी ३ ला उठतात आणि ५.३० ला निघणार्‍या सफार्‍यांसाठी सोबत नाश्ता पाठवतात हे कळाल्यावर आमच्या साठी २ पर्यंत जागणे निश्चित खुप होते. चार दिवसात आम्हाला एकदाही तक्रारीला वाव दिला नाही ह्या लोकांनी. जिथे गप्पा मारत बसलो असु तिथे गवती चहा घातलेला गरम वाफाळता चहा घेऊन येणार.. जवळच मस्त पै़की शेकोटी पेटवुन देणार.. सकाळी ५.३० ला उठवायला येणार (सफारीला उशीर होऊ नये म्हणुन..), सोबत भरगच्च नाश्ता पाठवणार.. आणि बोलणं सुद्धा अदबशीर.. लोचट नाही की अति गोगोड्ड नाही.. ह्यांच्यामुळे मुबा कायम स्मरणात राहील..

मुबाच्या आजुबाजुची स्थानिक लोकांची घरं







२२ तास झाले होते घराबाहेर पडुन.. खुप मोठा प्रवास झाला होता.. रात्री २.३० ला पाठ टेकली खरी पण ५.३० ला लगेच उठायचही होतं.. लोक्स एवढे दमले होते.. क्षणभर वाटुन गेलं.. कुणी उठेल का सफारी साठी?..पण मला खात्री होती.. लोक्स ५.३० च्या ठोक्याला उठणार.. "स - फा - री" ह्या जादुई शब्दासाठी उठणार..

आणि न जाणो..आत्ता या क्षणी बाजुच्या जंगलामध्ये तो त्याचे भेदक डोळे रोखुन उभा असेल..आपली वाट पहात..!




तळटीपा:-

१. तुमचं बुकिंग कोणत्याही गेटच असलं तरीही तुम्ही कोणत्याही गेट मधुन आत जाऊ शकता. जंगलातल्या जंगलात मग तुम्ही ३०-४० किमी अंतर कापुन ज्या झोनच बुकिंग आहे त्या झोन मध्ये जाऊ शकता. त्यामुळे वेळ वाया न जाता तुम्हाला जंगलात फिरायला मिळतं

२. कान्हा मधले हॉटेल्स

३. एम्.पी टुरीझमची कान्हा मधली हॉटेल्स

४. सफारींची संख्या अत्यंत कमी असते. आणि दिवाळी सारख्या सुट्टीच्या सिझनमुळे धडाधड बुकिंग होते. ऑनलाईन व्यतिरिक्त तुम्ही सफारीच्या दिवशी ऑन द स्पॉट तिकीट मिळवु शकता पण ते खरच खुप कठिण आहे. आणि एवढ्या लांब जाऊन असा दैवावर हवाला ठेवण्यात काही अर्थ नाही. अर्थात काही लोक इतके लकी होते की सहज म्हणुन सकाळी लवकर गेले, असं ऑन द स्पॉट तिकीट मिळाले म्हणुन अचानक सफारीला गेले आणि नुसता वाघ नाही तर वाघीण आणि एकेमेकांशी मस्ती करणारे त्यांचे बच्चे तासभर पाहुन आले.

५. वरील सर्व फोटो माझी बहीण,नवरा,वहीनी आणि दादा ह्यांनी काढले आहेत.

No comments:

Post a Comment