नमस्कार मंडळी!
मागच्या वर्षी नवरोबा कृपेने आमचे पाय अमेरिकेच्या पुण्यभूमीला लागले.
इथल्या पावन अनुभवांवर एक विस्तृत लेखमाला येतच आहे (थांबा..थांबा..असे पळू
नका!!). हा मात्र न्यूयॉर्क शहराच्या बाहेर पडून केलेल्या एकमेव भटकंतीचा
वृत्तांत!
तर त्याचं झालं असं की २ महिने अमेरिकेत राहायचं म्हणून आधी मनमोर
पिसारा फुलवून थुईथुई नाचत होता. त्यामुळे फारच उत्साहात आजूबाजूचं सगळंच
दणादण पाहून घेतलं. मग लक्षात आलं की अजून जवळपास एक महिना शिल्लक आहे.
न्यूयॉर्कच्या बाहेर जाउन काही बघता येईल का ते शोधू लागले. नवर्याने
वॉशिंग्टन अक्षरशः पिंजून काढलं होतं आणि मलाही आता अमेरीकेतल्या उंच
इमारती आणि संग्रहालये पाहून भयानक कंटाळा आला होता. "अमेरिकेतला निसर्ग
असतो कसा? ह्यांच्या डोंगर दर्या दाखवा तरी." असं म्हणून वॉशिंग्टन वगैरे
काही न पाहता सरळ अपस्टेट मध्ये काय पहाता येईल ह्याचा धांडोळा घ्यायला
सुरुवात केली.
गुगल आणि अमेरिकावासी मित्र मैत्रिणींना पुष्कळच बोअर करुन झाल्यावर
अपस्टेटकडील कोणताही माऊंटन किंवा प्रसिद्ध सरोवरं (लेक) बघुन यावं असं
ठरलं. मी माझ्या "शक्य तितकं फिरुन घ्या" बाण्याने जमेल तेवढी ठिकाणं एका
दमात बघण्याचा मनसुबा रचत होते. माझे हे मनसुबे सांगितल्यावर एका
मैत्रिणीचा छान मेल आला, "बयो, अजून १५ वर्षांनी तुला किती दगदग झाली हे
आठवायचय की आपण कित्ती सारी ठिकाणं एकाच ट्रिप मध्ये पाहिली हे? दोनच
गोष्टी पाहा. पण मनमुराद पहा! किती स्पॉट "कव्हर" केले ह्या पेक्षाही किती
स्मरणीय सहल झाली हे महत्वाचं."
मग मी माझ्या डोक्यातुन खूप काही एकदम पाहायचं खूळ काढून टाकलं. पण
तरीही माझ्या भारतीय मेंदुला "गुणिले ६०" सिंड्रोम झालेला असल्याने जे काही
असेल ते बजेट मध्ये असलंच पाहिजे हे मात्र नक्की होतं.
आमच्याकडे गाडी
नाही, भाड्याने घेतली तरी मुळात चालवताच येत नाही अशी परिस्थिती. त्यामुळे
टुर्स आणि ट्रॅव्हल्सला शरण जाण्यावाचून काही पर्याय शिल्लक नव्हता. मग
गुगलला साकडे घातले.
"गुगल गुगल ऑन द ऑल, व्हॉट इज द चीपेस्ट टुर ऑफ देम ऑल?" (चीपेस्ट महत्वाचं)
मला वाटलं होतं की साध्या साध्या गोष्टींना कै च्या कै किंमती असणार्या
ह्या अमेरिकेत, सहल करणे म्हणजे नक्कीच देशोधडीला लागण्या इतकं खर्चिक
प्रकरण असणार. पण तेव्हा मी हे विसरले होते की हे वाक्य फक्त अमेरिकन
गोष्टींना लागू होतं. "चायनीज" मालाला नाही; आणि अमेरिका हा खरं तर चीनी
लोकांचा देश असल्याने "चायनीज" मालाला काही तोटाच नाही. मला खरंतर
कोणत्याही प्रकारे चीनी अर्थव्यवस्थेला मदत करायची नव्हती. कसकायअप्पा
(वॉट्सअॅप) वर 'चीन्यांना बुडवा' चे मेसेज वर मेसेज फिरत होते. त्यामुळे
मनाला कुठे तरी ह्या टुर्स बुक करवेनात. मग मी अजुन शोध सुरु ठेवला. बाकी
टुर्सच्या किंमती पाहून माझे डोळे पांढरे झाले. परत परत पाय चीन्यांकडेच
वळू लागले. शेवटी एकदा न रहावून मी त्यांच्या टुर्सच्या किंमती पाहिल्या
आणि अचानक चीनी लोक मला तितकेसे दुष्ट वाटेना झाले! ;)
मला अपस्टेट खुणावत होतं. समोर स्वस्त आणि मस्त टुर्सचे पर्याय होते.
शेवटी कसंकायाप्पावर सतत कोकलणार्या "चीन्यांना बुडवा" मेसेजला मी
डोक्यातून डिलीट केलं आणि नवर्याने दोन मिनिटात टूर बुक करुन टाकली.
"टेक टुर्स" ही एक बर्यापैकी नाव असलेली ट्रॅव्हल्स कंपनी अनेकांकडून ऐकलेली होती. ह्यांच्या 2-Day Upstate New York, Lake George, Lake Placid Tour from New York
ह्या पॅकेजचे बुकिंग झाले. दोन दिवसात सिक्स फ्लॅग्स हे अॅडव्हेनचर पार्क,
लेक जॉर्ज, ऑस्बल चाजम, व्हाईट माउंटन आणि हाय फॉल्स गॉर्ज ही ठिकाणे
फिरायची होती. म्हणजे बघा, हे असं जायचं होतं.

प्रत्येकी १०० डॉलर्स मध्ये ही सहल होणार होती. २ लोकांच्या बुकिंगवर
तिसरा फ्री असल्याने अबीरला (मुलाला) काही चार्जेस पडले नाहीत. ह्या मध्ये
दोन दिवसांचे जाणे येणे आणि एका रात्रीचा मुक्काम अंतर्भूत होते. बुकिंग
केल्यावर व्यवस्थित डिटेल मेल आला. जाण्याच्या आदल्या दिवशी कुठे यायचे,
कितीला यायचे ह्याची माहिती देणारा एस.एम.एस ही टुर गाईड कडून आला.
दुसर्या दिवशी सकाळी न्यू जर्सीच्या प्रसिद्ध इंडियन स्ट्रिटच्या एका
कोपर्यावर जमायचे होते. एका दिवसात होईल तेवढी तयारी करुन मी अलार्म लावून
झोपले. खरं तर अलार्म लावला की माझी झोप होत नाही, मग पुढचा दिवस वाईट
जातो. पण दुसर्या दिवशी चक्क मस्त झोप झाली.
"कमाल आहे नै, इतकी झोप झाली तरी अलार्म अजून झालाच नाही!" असं म्हणून
घड्याळ पाहिलं, तर मस्त झोप का झाली ते समजले...अलार्म झालाच नव्हता!!
निघायला १५ मिनिटं शिल्लक असताना जाग आली होती.
बाकी प्रजा साखरझोपेत होती. मी जवळपास शॉकमध्ये गेले होते. धक्का बसला
ना की फार छान रिअॅक्शन देते मी. अगदी मालिकांमध्ये दाखवतात तशीच. लोक
त्याला "ओव्हर रिअॅक्टींग" म्हणतात, पण माझी डिफॉल्ट सेटिंगच तशी आहे. तर
त्याच सेटिंग प्रमाणे मी जोरात किंचाळले. दचकून नवरा बेडवरुन खाली पडला.
अबीर मात्र कुंभकर्णाची औलाद असल्याने हललाही नाही!
मी किंचाळून झोप उडवल्याने की काय, पण प्रजा घाबरुन १५ मिनिटात बाहेर
पडली आणि अगदी वेळेत न्यूजर्सी व्हाईट कॅसेलला पोहचली. पाच एक मिनिटात बसही
आली आणि "सुकी" नावाच्या चिनी मुलीने गाईड म्हणून सगळ्यांचे स्वागत केले.
सगळे प्रवासी बसल्यावर बस निघाली. प्रसन्न सकाळी अशी ट्रिप निघाली म्हणुन
मनरुपी मोगॅम्बो खूश व्हायला सुरुवात झालीच की अचानक "चिंच्यां..कुईईई.."
असे लिहिताही येत नाहीत असले आवाज यायला सुरवात झाली. मी आणि माझी प्रजा
सुखेनैव खिडकीतून बघत बसलो होतो ते दचकलो. माझ्या सकाळच्या किंचाळण्याने
आधीच नवरा दहशतीखाली होता. आता काय नवीन म्हणून बघितलं, तर सुकीने माईकवरुन
चिनी भाषेतून बोलायला सुरूवात केली होती आणि त्याचा तो आवाज होता. म्हणजे
निव्वळ टुर कंपनी आणि गाईड चिनी नसुन, दोन दिवस ऐकावे लागणारे प्रवचनही
चिनीभाषेत असणार होते. पुढचे दोन दिवस सुकी "२ वाक्य इंग्रजीत मग २ वाक्य
चिनी" अशी तळ्यात मळयात उड्या मारत होती.
पहिलाच स्टॉप म्हणजे "ग्रेट एस्केप" भरपूर दूर असल्याने पुढचे २-३ तास
गाडी हायवेवरुन नुसती पळणार होती. सुकीने पुढच्या दोन दिवसात ज्या
अॅक्टीव्हिटीज करायच्या आहेत त्याचे पैसे गोळा केले. तुम्हाला हव्या त्याच
अॅक्टिव्हिटी तुम्ही घ्यायच्या होत्या. प्रत्येकी साधारण १००-१५० डॉलर्स
खर्च होता. अबीरला राफ्टींग करता येईल की नाही ही शंका होतीच. त्यामुळे
आम्ही जे निश्चित होतं त्याचे पैसे देऊन ठेवले. बाकी ऐनवेळेस निर्णय
घेण्याचीही मुभा होतीच. असं पाकिट हलकं झाल्यावर मी परत "गुणिले ६०" चा खेळ
सुरु करु नये म्हणुन गै गै करुन घेतली. थोड्यावेळाने डोळे उघडले तर
अमेरिकेच्या नॅशनल हायवे वरुन गाडी पळत होती. आजुबाजुला एकतर उंचच उंच झाडं
दिसत होती, नाही तर भले मोठे मॉल्स. कुठे वस्तीच दिसेना...इतक्यात गाडीने
झोकदार वळण घेतलं आणि सुकीने "चला, हला, आलं ग्रेट एस्केप उर्फ सिक्स
फ्लॅग्स" अशी दोन दोनदा घोषणा केली. साधारण ४-४.३० तास आमच्या हातात होते.
The Great Escape and Splashwater Kingdom
हे एक थीम पार्क आहे. १३५ हून अधिक राईड्स असणार्या ह्या पार्कमध्ये
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी भरपूर खेळ आहेत. हा भला थोरला नकाशा पाहून तुमच्या लक्षात येईलच.

हाच तो नकाशा मला आधी मिळाला असता, तर किती बरे झाले असते. इथे इतक्या
गोष्टी होत्या की नक्की सुरुवात कुठून करावी हेच कळेना. आम्ही दोन चुका
केल्या होत्या. एकतर अबीरचा स्ट्रोलर बसमध्ये विसरुन आलो होतो. लक्षात
घ्या, अमेरिकेत पोरं सोबत असताना स्ट्रोलर नसणे हा अक्षम्य गुन्हा आहे.
तुमचे पाय गळ्यात घालुन फिरावं लागेल अशी वेळ लवकरच येते. ह्यात भरीस भर
आम्ही भली मोठी एक बॅग घेऊन आत गेलो. लॉकर्स विश्वास बसणार नाहीत एवढे महाग
होते. म्हणजे अबीर आणि ही बॅग मिरवत फिरायचं होतं.
म्हणून मग अबीरचा आत्मा थंड करायला लहान मुलांच्या खेळण्यापासुन सुरुवात
केली. सुकीने मोजुन जे ४ तास दिले होते इथे फिरायला, त्यापैकी ३.५ तास
बाळराजांच्या राईड्स वर गेले. एक तर राजे एका राईड कडुन दुसर्या राईडकडे
सैरावैरा पळत होते. नाही तर कपडे काढून कारंज्यात नाचत होते. त्याच्या मागे
नाचून वेळ संपत आल्यावर आणि त्याच्या बाललीलांचा अगदी वैताग वैताग
आल्यावर, किमान एकातरी राईडवर बसू म्हणून मी आणि नवरा वॉटर पार्क कडे वळलो.
मग अबीरला आळीपाळीने सांभाळून एक - एक वॉटर स्लाईड राईड आणि पाण्याला
घाबरुन बोंबलणार्या अबीरला डोक्यावर घेऊन "पाच मिनिटं" स्विमींगपूल मध्ये
डुंबणे इतका "मनसोक्त" आनंद घेऊन आमचा कबिला निघाला. अबीरला घेऊन पुढची
ट्रिप लास वेगासला नेण्याचे स्वप्न पहाणार्या नवर्याला समजायचं ते समजलं
होतं!
आम्ही खास इतका प्रवास करुन, तिथंवर जाऊन, राईड्स "नुसत्या" पाहुन आलो.
हे फोटो पाहुन तुम्ही आणि आम्ही अनुभवांच्या एकाच पातळीवर आहोत. फक्त
तुम्हाला मनस्ताप झाला नाही इतकंच!
आल्या आल्या ह्या भव्य राईडने स्वागत केले, पण ह्यात बसण्याची आम्ही तरी हिम्मत करु शकलो नसतो.

आम्ही जिथे वेळ घालवला त्याच लहान मुलांच्या सेक्शनचे फोटो




एका ठिकाणी लहान मुलांसाठी हे नाटक चालू होते.


खाण्यासाठी कॅफे आहेतच. पण अर्थात तिथे बर्गर आणि को़क शिवाय फार काही
वेगळं मिळत नाही. एकंदरीत न्यूयॉर्कच्या बाहेर पडलं की शाकाहारी माणसांचे
जाम हाल होतात. तेच ते बर्गर, कोक, पिझ्झे आणि सॅण्डविच. एकंदरीत पावाच्या
आत / वर भाज्या कोंबा, चीझ पसरा आणि कोक सोबत नरड्याखाली ढकला आणि मग वजन
का वाढते ह्यावर चिंता करत बसा.
एवढ्या एका चढ एक राईड्स असताना आम्हाला मात्र काही सुद्धा धमाल करायला
मिळाली नाही. फार हळहळ करण्यात काही अर्थ नाही. एक संपूर्ण दिवस घालवायला
छान ठिकाण आहे. तेवढा वेळ टुर्सवाल्यांनी प्लॅन केला नाही हे त्यांना
फीडबॅकमध्ये मात्र सांगून आले.
आमच्या तिघांमध्ये संपूर्ण दिवस राईड्स, खाणे-पिणे, नाचणे, आई-बापाला
पळवणे ह्यात घालवला असल्याने अबीर प्रचंड आनंदात होता. ठरल्या वेळेला आम्ही
दमून भागून बस मध्ये जाउन बसलो. बस निघाली म्हणे म्हणेस्तोवर तर लेक
जॉर्जला पोहोचली देखील!
अमेरिकेत हे छान आहे. एका क्षणी तुम्ही मोठमोठ्या रस्त्यांवरुन जात
असता, झोकदार वळण येतं आणि अचानक समोर काही तरी अप्रतिम उभं ठाकतं.

असून असून एका तळ्यात काय असणार? असा विचार करता करता समोर आला "क्वीन
ऑफ अमेरीकन लेक्स"!!! उगाच नाहीये हा 'क्वीन' प्रचंड मोठा जलाशय, मागे
दुरवर दिसणारी डोंगररांग, किनार्यावर दिमाखात उभा क्रुझ!

* आंतरजालावरुन साभार :- http://lakegeorgesteamboat.com

दिवसभर इतकी दगदग झाली होती की ह्या अशाच शांत ठिकाणाची गरज होती.
आम्हाला तासभर मोकळं सोडून सुकी आमच्यासाठी बोटीची तिकिटं काढायला निघून
गेली. आम्ही निवांत किनार्यावर जाऊन पाण्यात पाय टाकून बसलो. इतकं सुरेख
नितळ पाणी, गार गार, झुळझुळीत.

संध्याकाळची वेळ. समोर जॉर्ज असा शांतपणे पहुडला होता. काही न बोलता मुकपणे बसून रहावं अशी वेळ.

मला अमेरिकेत आवडलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वच्छता. सगळं कसं आखीव
रेखीव आणि स्वच्छ. मग आपोआपच सुंदर वाटतं. इथे सुद्धा कुणाची गडबड नाही,
विक्रेत्यांचे आवाज नाहीत, भिकार्यांचं हटकणं नाही, प्लास्टिकच्या
कचर्याचं पाण्यात तरंगणं नाही. सगळं अगदी चित्रात असल्या सारखं!
सुकीबाई बोटीची तिकीटं घेऊन आल्या. आम्ही "मिनी हा हा" ह्या बोटीत जाणार होतो. (शप्पथ असंच नाव आहे)
ही आमची मिनी हा हा!!
ही आमची मिनी हा हा!!

* आंतरजालावरून साभार :- http://lakegeorgesteamboat.com
तीन मजली मिनीवर आम्ही एक तास घालवणार होतो. ती आम्हाला लेक जॉर्जची सैर
करुन आणणार होती. बोटीत शिरण्या आधी प्रत्येक कुटूंबाचा एक असा फोटोसेशनचा
अघोरी प्रकार झाला. आम्हाला सर्वात वरच्या डेकवरती जागा मिळणं अवघडच होतं.
मग आम्ही एका खिडकीपाशी खुर्च्या टाकून बसलो. मिनी हा हा म्हणता म्हणता
भ्रमंतीला निघाली. मागे स्पीकरवर बोटीविषयी माहिती देणे चालू होते.

अमेरिकेत यत्र तत्र सर्वत्र दिसणारा झेंडा!


लेक जॉर्जचे वैशिष्ट्य म्हणजे किनार्यावरची टुमदार घरं! इथे म्हणे
मिलीयन डॉलर्स खर्च करुन रेती टाकून किनारा तयार करण्यात आला होता आणि
लोकांनी खास उन्हाळ्यात येऊन रहायला तिथे आपली घरं बांधली होती. मला पैसा
काय आनी जानी आहे घर दारं विटांमध्ये काय जीव टाकायचा? वगैरे संन्यासी
विचार नेहमी येतात. आणि अशी घरं बघून निघूनही जातात. हे असं तळ्याकाठी घर
बांधायला तरी पाच पन्नास मिलीयन डॉलर्स पटकन कमावून टाकावेत असं वाटतं.

तसं तर आपल्या पानशेत वगरे साईडलाही अशी घरं आहेत पाण्याकाठी, पण का कोण
जाणे ती एवढी मनाला भावत नाहीत. प्लॉटिंग करुन, कुंपणं घालून बांधल्याने
की काय, पण ती निसर्ग उध्वस्त करुनच बांधली आहेत एवढंच जाणवत राहातं. तसा
निसर्गाला धक्का इथेही लागला असेल, पण इथली घरं आजूबाजूच्या झाडांमध्ये
मिसळून गेली आहेत असं वाटत रहातं. शिवाय ही घरं असतात देखील फार सुरेख. हे
मोठ्या घरा सारखं डीट्टो छोटं घर दिसतय ना, ते म्हणजे बोटीसाठी घर...मॅचिंग
मॅचिंग! अनेक जण, अगदी लहान मुलं सुद्धा आपल्या पिटुकल्या बोटी घेऊन
पाण्यात वलव्हत चालले होते.

आता सूर्यास्त व्हायला लागला होता, बोटीने परतीचा मार्ग पकडला. बोट जसं
जशी जवळून जाते, तसं तसे तिथले लोक बोटीतल्या लोकांसाठी हात हलवतात. आम्ही
पण उगाच ओळख पा़ळख नसलेल्या पन्नास लोकांना हात हलवून हसत होतो.

राईड संपता संपता नवर्याला कुठेशीक इंजिन रुम दिसली. म्हणून पटकन तिथेही डोकावून आलो!

'मिनी हा हा' चे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या बोटीवर ५-६ नोझल्स मधुन
वाफ बाहेर फेकून मस्त गाणे वाजवले जाते. बोट किनार्यावर परत येत असताना
खास करुन हे गाणे वाजवले जाते. ज्यात फक्त ह्या नोझल्सचाच नाही तर
डोंगरांमधून येणार्या इकोचाही वापर होतो.
आपला तापोळा किंवा बामणोलीचा तलावही इतकाच सुंदर आहे बरं का. किंवा काकणभर
सरसच. पण जरा येणार्या माणसांच्या व्यवस्थेचं आणि स्वच्छतेचं पाहतील तर
शप्पथ. आपली पर्यटन स्थळं इथेच मार खातात. उगाच भारताची आठवण येऊन हळहळ
वाटली.
आता आम्ही अपार दमलो होतो. डायरेक्ट हॉटेलात नेऊन बेडवर फेकून दिलं असतं
तरी चाललं असतं. अॅल्बनी ह्या न्यूयॉर्कच्या राजधानीमध्ये मुक्काम होता.
हॉटेल बर्यापैकी होते. त्याआधी चिन्यांनी एका चायनीज हॉटेलात नेऊन १८-२०
डॉलर्स प्रत्येकी घेऊन अमर्याद बुफे समोर सोडले. मांसाहारी लोकांचा आनंदाने
जीव जाईल इतकी व्हरायटी. पण आमच्या तोंडाला पुसायलाही काही शाकाहारी
मिळेना. उगाच २-४ पदार्थ (म्हणजे सॅलडच) घेउन मुकाट बसले. लोक लोबस्टरचा
डोंगर घेऊन बसले होते. तरी मी चिवटपणे एक दोन पदार्थ तिथल्या वेटर समोर
नेऊन "हे व्हेज आहे का?" अशी विचारणा केलीच. त्यांनी मला "हे बीन्स आणि
राईस पासून बनवलं आहे. बीन्स आणि राईस तुमच्यासाठी व्हेज असतो का?" असा
प्रश्न विचारुन मलाच गार केलं. "व्हेज" ची व्याख्या इतकी धुसर असल्याने मग
तर माझा "व्हेज" लिहीलेल्या पदार्थांवरचाही विश्वास उडाला. ज्याची ओळख पटली
तेच मी ताटात घेतलं. मांसाहारी असूनही केवळ हॉटेल चीनी आहे म्हणून नवराही
भीत भीतच खात होता.
जेवण झाल्यावर मात्र तिथल्याच बाकड्यांवर पथारी लावावी का अशी अवस्था
झाली होती. सुकीने आम्हाला हॉटेलात सोडले. उद्या हॉटेलकडून नाश्ता मिळेल
अशी घोषणा केली. समस्त इंटरनॅशनल प्रवासी जनता खूश!
मग तिने अजूनच आनंदात "उद्या खूप खूप फिरायचयं हं, तेव्हा सकाळी ६.३० ला भेटूया" ही पुढची घोषणा केली.
जनतेचा कानावर विश्वास बसेना! पण सुकीला बहुदा याची सवय असावी. ती लोकांना
अजिबात भीक न घालता रुमवर निघून गेली. आम्ही सुद्धा उद्याचं उद्या पाहू
म्हणुन पाचचा अलार्म लावून झोपलो! (आमच्या अलार्मची सिस्टीम सुकीला माहिती
असावी. तिने ५.३० चा वेकप कॉल रिसेप्शनला सांगून ठेवला होता)
आत्ता पर्यंत तरी चिन्यांनी चांगली सोय केली होती. उद्याही असाच मजेदार दिवस जाईल अशी स्वप्न पहात आम्ही ताणून दिली!
No comments:
Post a Comment