Thursday, 28 May 2015

सफर तामिळनाडुची! - कुन्नुर (भाग ५)

आम्ही कुन्नुरला उतरणार होतो. ३.५ तासाचा जादुई प्रवास अखेर संपला होता. पण आजुबाजुला नजर टाकल्यावर लक्षात आलं की ज्या जादू संपली नव्हती.. तर आता चहुबाजुला पसरली होती!

कुन्नुर हे उटी जवळ अवघ्या २० किमी वर असणारे गाव. पण उटीपेक्षा फारच गोड्डुलं!! "उटीपेक्षा कुन्नुरला या" असं ट्रिप अ‍ॅडव्हायझर वरच्या फोरम्स मध्ये स्थानिकांनी सांगितलं. बर्‍याच ठिकाणी कुन्नुरचं कौतुक ऐकुन अखेर कुन्नुर मध्येच हॉटेल शोधलं. अनेक महागड्या हॉटेल्स नंतर सहज B & B मध्ये शोधलं तर मिळालं  "अल दिवानो!". म्हणलं, वाह काय नाव आहे!! मेल वर बरंच निगोसिएशन करुन अखेर बुकिंग करुन टाकलं. कुन्नुर मध्ये उतरल्यावर रिक्षानी १० मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. हॉटेल जरी अगदी लहानसं असलं तरी आहे फारच क्युट! पाहताक्षणी मनातच भरलं!









* हा फोटो आंतरजालावरुन साभार

हॉटेल मधुन दिसणारा नजारा..




कुन्नुरमध्ये आमच्याकडे फक्त एकच दिवस होता. त्यात सगळेच पॉईंट्स फिरत बसायची इच्छा नव्हती म्हणून निवडक २-३ जागा पाहुन पुढे बंदिपुरला जायचं होतं. पण ते सगळं नंतर पाहु, आधी जेवायची सोय काय ते पहायला हवं होतं. अल दिवानो वाले ऑर्डर दिली की बाजुच्या हॉटेल्स मधुन आणुन देतात खरं. पण कुन्नुर आणि उटी मधल्या "क्वालिटी" रेस्टॉरंट बद्दल फार वाचलं होतं. ते आमच्या हॉटेलच्या अगदी शेजारीच असल्याने तिकडे कुच केलं.

क्वालिटी मध्ये दुपारी बुफे असतो. नेहमी प्रमाणे सुप, सॅलड ते डेझर्ट असणार असा आमचा कयास. तसंच होतं ते, पण विथ साउथ इंडीयन ट्विस्ट! म्हण्जे साधी कोबीची भाजी हो, पण चारदा घेऊन खाल्ली इतकी क्लास! रस्सम तर अहाहाच!




आडवा हातच मारला अगदी!! सुप, सॅलेड, मश्रुम इन व्हाईट ग्रेव्ही, पनीर टिक्का, कोबीची साऊथ इंडियन स्टाईल भाजी, रस्सम, सांभार, पुलाव, कर्ड राईस, चायनीज काही पदार्थ, पायनॅपल कस्टर्ड आणि फक्त पायसमवर एवढंच काय ते खाल्लं!! बुफेवर ताव मारल्यावर मिशा पुसुन आधी किचन मध्ये जाऊन शेफ शोधला. त्याला म्हणलं "या महाराजा! तुमचा फोटो मस्ट आहे!"




हॉटेलचे मॅनेजर श्री. श्रीधर सोबत शेफ श्री. अब्दुल!

कुन्नुरमध्ये भयंकर गारवा होता, त्यात हे असलं जेवण. आता साक्षात रंभा उर्वशी जरी नृत्य करायला उतरल्या असत्या तरी ते पहायला आम्ही जागे रहाणार नव्हतो. दुलईमध्ये घुसुन मंडळी घोरु लागली.

हॉटेल मॅनेजरने गाडी मिळवुन दिली होती. उठल्यावर साईट सीईंगला निघालो. आजुबाजुला भयंकर धुके पसरले होते. अशा धुक्यात काय दिसणार अशी धाकधुक होती. पण आमचा "गाडीवान दादा" फुल्ल कोण्फिडन्स मध्ये आम्हाला  "डॉल्फिन्स नोझ" कडे नेत होता.

म्हणाला "अरे साब, एकबार जोरसे हवा आयी तो १ मिनिट्मे ये सब हट जायेगा.. आप चलो तो.."

चलो तर चलो..!




फक्त आणि फक्त चहाचे मळे, चहाची हिरवीगार झुडपं, त्यात "एक कली दो पत्तीया" करत चहाची पानं तोडत असणार्‍या बायका, वळणावळणाचे रस्ते असा माहौल होता. आजुबाजुला निलगिरी पसरला होता, पण त्याची भव्यता धुक्यात लपुन गेली होती.




बर्‍याच वेळानंतर डॉल्फिन नोझ आले. मुळात असे वेगवेगळे पॉईंट्स का बनवले आहेत तेच कळत नाही. कुन्नुरमध्ये कुठेही उभे रहा तेच दृश्य सतत दिसत रहाते.. निळेशार आकाश, हिरवेगार चहाचे मळे आणि मागे उभा निलगीरी..! त्यासाठी कोणत्याही विशिष्ट ठिकाणी जायची गरजच नाही. पण तरी आम्ही गेलो.

असा डोंगरावर एक पॉईंट होता, समोर दरी, आणि जिथे उभं राहुन आपण पहातो ती जागा लंबु़ळ्की आहे म्हणुन म्हणे "नोझ"!! तिथे एक माणुस दुर्बिण घेऊन उभा होता. दहा रुपयात, १० सेकंदात, ५ पॉईंट्स दाखवत होता. ते पॉईंट्स म्ह्णजे समोर दिसणारा धबधबा, एक झोपडी आणि असंच काहीबाही. वास्तविक हा पागलपणा होता, पण प्रत्येक जण १०/- देऊन तो करत होता. न जाणो काही बघायचं राहुन गेलं तर!

त्यापैकी दुर्बिणी शिवायही डोळ्यांना दिसणारा आणि कानाला ऐकु येणारा धबधबा.




ह्यानंंतर जाऊन धडकलो "हायफिल्ड टी फॅक्टरी" मध्ये.




ह्या फॅक्टरी मध्ये चहा बनतो आणि मग त्याचा लिलाव होतो. मोठ मोठ्या कंपन्या हा चहा विकत घेऊन मग त्याला आपलं नाव देतात. आत गेलं की तिथे बसलेल्या माणसाने फॅक्टरी बघायचीये का म्हणुन सरळ आम्हाला गाईड प्रमाणे व्यवस्थित सर्व दाखवुन आणले. आधी त्याने चहाचे झाड, त्याचे शास्त्रीय नाव, कोणती पाने तोडायची, कोणत्या पानाचा कोणता चहा बनतो (वरच्या कळीचा व्हाईट टी - कॅन्सर साठी उत्तम, मग दोन पानांचा - ग्रीन टी - अ‍ॅण्टीऑक्सिडंट आणि उरलेल्या खालच्या पानांचा नेहमीचा चहा) हे सांगितले. हे झाड छाटत रहावे लागते. छाटले नाहीच तर ते इतके मोठेही होते.




पुढे जाऊन मग ही पाने वेगवेगळी करुन वाळवतात, मग कटर मध्ये बारिक होऊन त्यावर फर्मेंटेशनची क्रिया होते, मग चाळुन वेगवेगळ्या प्रतीचा चहा बनतो. (सर्व काही जसं आठवतय तसं लिहीलय, चु.भु.दे.घे)

वरच्या ह्या प्रक्रियेचे काही फोटो










सर्व पाहुन झाल्यावर बाहेर Factory Outlet मध्ये आलो. तिथे वेगवेगळ्या चवींचे चहा मिळतात. आधी चव घेउन हवा तो चहा तुम्ही घेऊ शकता. मसाल्याचे पदार्थ, वेगवेगळी औषधी तेलं वगैरेही बरंच काय काय मिळतं. आम्ही सगळंच थोडं थोडं घेतलं. गाईडने पैसे काहीच घेतले नाहीत. बहुदा त्यांना कमिशन मिळत असावी.

टि फॅक्टरी समोर दिसणारे विहंगम दृश्य




ह्या नंतर थेट गेलो "सीम्स पार्क" मध्ये

सीम्स पार्क ही एक उतारावर बांधलेली फार मोठी बाग आहे. व्यवस्था सुद्धा उत्तम आहे. उताराच्या शेवटी एक तळे आहे. त्यात पुर्वी बहुदा बोटींग वगैरे असावं.




माझ्याकडचे इथले फोटो सापडत नाहीत म्हणून हे काही आंतरजालावरुन साभार







घनदाट झाडं, शांतता, पक्ष्यांची किलबिल, कमालीची स्वच्छता, कलात्मक रचना ह्यामुळे सीम्स पार्क ही आवर्जुन पहावी अशी जागा आहे. कधीतरी इथे जाऊन नुसतेच पक्ष्यांचे आवाज ऐकत बसायला फार आवडेल मला..!

दुसर्‍यादिवशी उठुन आम्ही उटी मार्गे बंदिपुरला जाणार होतो. उटी पहाण्यात तसा काही इंटरेस्ट नव्हता आम्हाला पण वाटेत आहेच म्हणुन जाणार होतो. जाताना मात्र डोळ्याचं पारणं फिटावं असा निसर्ग! आज स्वच्छ सुर्यप्रकाश होता. काल जे डोंगर धुक्यामुळे दिसत नव्हते ते आज निळ्यारंगाच्या नाना विविध छटांमध्ये दिसत होते. ह्या डोंगर रांगांना Blue Mountain का म्हणतात ते आता समजत होतं. गाडी थांबवुन तिथेच बसुन रहावं आणि मनभरुन हे सौंदर्य डोळ्यात साठवावं असं वाटत होतं!










जाताना दोडाबेट्टा पहायचाही इरादा होता, पण तो रस्ता चांगला नसल्याने तिथे जाता आले नाही. उटी सुरु झालं आणि सगळीकडे नुसता गजबजाट. अपेक्षेप्रमाणे उटीचा अनुभव काही कुन्नुर एवढा सुखद नव्हता. कुन्नुरला अत्यंत गारवा होता तर उटीला चक्क उकडत होतं. रोझ गार्डनला गेलो तर तिथे सिझन नसल्याने की काय पण फारसे गुलाब नहते आणि जे होते ते ही सुकत चाललेले. उटी लेकला गेलो तर तिथे तर जत्राच होती. आलोच आहोत म्हणुन थोडं बोटींग केलं.




उटीला फार वेळ घालवण्यात अर्थ नाही हे कळुन चुकलं. त्यापेक्षा लवकर पोहोचुन दुपारची सफारी तरी गाठता येईल म्हणुन आम्ही बंदिपुरचा रस्ता धरला. गाडी मदुमलाई नॅशनल पार्क मधुन धावत होती. इथे एरवी सुद्धा हत्तींचे कळप दिसतात म्हणे. नॅशनल पार्कने परत माझ्या मनावर गारुड  केलं. परत माझे डोळे "search" मोड मध्ये गेले. खरं तर इतक्या मोठ्या अपेक्षा आणि इतके कमी चान्सेस घेऊन नॅशनल पार्कमध्ये फिरणं म्हणजे छळ आहे नुसता. पण एकदा ते व्यसन लागलं की पाय वळतातच.

ह्या वेळेस आता वाघाची वाट पहायची नाही असा मी पक्का निश्चय केला आणि डोळे मिटुन बसले. माझ्या निश्चयाला कसे धमाकेदार सुरुंग लागणार होते ते थोड्याच वेळात कळणार होतं!!

क्रमशः






No comments:

Post a Comment