Thursday, 28 May 2015

सफर तामिळनाडुची! - कुन्नुर (भाग ५)

आम्ही कुन्नुरला उतरणार होतो. ३.५ तासाचा जादुई प्रवास अखेर संपला होता. पण आजुबाजुला नजर टाकल्यावर लक्षात आलं की ज्या जादू संपली नव्हती.. तर आता चहुबाजुला पसरली होती!

कुन्नुर हे उटी जवळ अवघ्या २० किमी वर असणारे गाव. पण उटीपेक्षा फारच गोड्डुलं!! "उटीपेक्षा कुन्नुरला या" असं ट्रिप अ‍ॅडव्हायझर वरच्या फोरम्स मध्ये स्थानिकांनी सांगितलं. बर्‍याच ठिकाणी कुन्नुरचं कौतुक ऐकुन अखेर कुन्नुर मध्येच हॉटेल शोधलं. अनेक महागड्या हॉटेल्स नंतर सहज B & B मध्ये शोधलं तर मिळालं  "अल दिवानो!". म्हणलं, वाह काय नाव आहे!! मेल वर बरंच निगोसिएशन करुन अखेर बुकिंग करुन टाकलं. कुन्नुर मध्ये उतरल्यावर रिक्षानी १० मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. हॉटेल जरी अगदी लहानसं असलं तरी आहे फारच क्युट! पाहताक्षणी मनातच भरलं!

Monday, 25 May 2015

सफर तामिळनाडुची !- कोइंबतोर आणि टॉय ट्रेन (भाग ४)


खरं सांगु का.. कोइंबतोर विषयी मला काहीच माहिती नाही! आम्ही इथे दोनच कारणांसाठी गेलो, एक तर दिर कुठे रहातो, काय काम करतो वगैरे पहायला आणि दोन म्हणजे साड्या! दिराची रुमच मुळात कोइंबतोरच्या बाजारपेठेत असल्याने काही फिरायचा योगही नाही आला. सकाळी उठलो, दणकट सौदेंडियन नाश्ता केला आणि दुकानांमध्ये घुसलो! 

Sunday, 24 May 2015

सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३)


रामेश्वरमहुन परत आल्यावर खरं तर कुठेही जाण्याची परिस्थिती नव्हती.. पण मीनाक्षी अम्माच्या मंदिरातल्या घंटा वाजु लागल्या.. आणि पाय आपोआप तिकडे वळाले..


दोन वर्षांपुर्वी नवरा चैन्नईला आला होता तेव्हा का कोण जाणे त्याने "रामेश्वरमला जाऊन येतो" असा हेका धरला होता. मला तेव्हा तामिळनाडु.. तिथली मंदिरं ह्याबद्द्ल फारशी काहीच माहिती नव्हती.. धनुषकोडीबद्दल ऐकलं तेही तेव्हाच. थोडं गुगलुन पाहिल्यावर मी त्याला जाता जाता मग तंजावर आणि मदुराई तरी करच असा सल्ला दिला. कुरकुर करत साहेब मदुराईला गेले खरे.. आणि परत येताना मदुराईच्या प्रेमात पडुन आले..! 

सफर तामिळनाडुची! - रामेश्वरम (भाग २)



शनिवारी संध्याकाळी आम्ही मदुराईला पोहोचलो.. वातावरण ढगाळ होतं.. थोडा थोडा पाऊसही चालु होता...आणि धनुषकोडीला जाऊन सुर्योदय पहायचं स्वप्नं त्या पावसात केव्हाचं वाहुन जाऊन एव्हाना रामेश्वराच्या चरणी पोहोचलं होतं.. आता मात्र पुढंच कसं करावं ह्याचा विचारही करवत नव्हता..

नवरा आधीच इथे एकदा येऊन गेल्याने त्याला मदुराई आणि रामेश्वरमची माहिती होती.. मागच्या वेळेस तो जिथे राहिला त्या "कावेरी महल" मध्ये जायचं होतं.. एकतर आमचा मदुराई की रामेश्वरमला मुक्काम हेच डळमळीत असल्याने आणि नवरोबांना आपण सोडुन जग्गात कुण्णी कुण्णी म्हणुन कावेरी महलला जाणार नाही ह्याची खात्री असल्याने बुकींग केलं नव्हतंच.. रिक्षात बॅगा टाकुन मी आणि नवरा साबांना घेऊन पुढे गेलो.. आमचं नशिब थोर असल्याने कावेरी महल फुल्ल होतं! मग पुढचा अर्धा तास "मदुराई की गलियोंमे" फिरण्यात गेला. अखेरीस पुढच्याच गल्लीत "हॉटेल एम्पी" सापडले..

Saturday, 23 May 2015

सफर तामिळनाडुची! - भाग १

माझं न नवर्‍याचं एक तत्व आहे.. समजा पैसे असतीलच.. तर माणसानी दुनिया पहावी.. बावळट सारखं घराला डेकोरेटच करणं, इंटीरियरच करणं ह्या सारख्या क्षुद्र गोष्टींवर पैसे घालवु नयेत.. आता ह्या वाक्यातली मुदलातली "समजा पैसे असतीलच तर.." हीच अट पुर्ण होत नसल्याने आम्ही पुढच्या भागाकडे कधी वळलोच नाही..! पण तरी वर्षातुन एकदा "कुठे तरी जायला हवं राव" नावाचा किडा वळवळतो..आणि मग लोक कसं ऋण काढुन सण साजरा करतात.. तसं आम्ही ऋण काढुन भटकायला जातो..! तसंही पैसा नाही म्हणुन कुरकुरायचय.. असंही कुरकुरायचय.. मग किमान दुनिया भटकुन मग घरी येऊन कुरकुरू..!

कान्हा नॅशनल पार्क - रामटेक (भाग ६) समाप्त


भोरमदेव झाल्यानंतर हॉटेल वर येऊन सर्वांच्या (मागे राहिलेल्यांच्या) शिव्या खाऊन.. वर त्यांनाच (उगाच) ४ शिव्या घालुन मी झोपले.. चिडचिडीवर उतारा म्हणुन खरेदी हा प्रकार (नशिबाने) शेवटी ठेवला होता.. बाकी सगळे खरेदीला निघुन गेले.. म्हणजे काय तर गेट वर एक लहानसे दुकान आहे.. तिथे पगमार्क असलेले टी शर्ट वगैरे निरुपयोगी गोष्टी मिळतात.. मला त्यातल्या त्यात खुप सारे पॉकेट्स असलेल्या जर्किन मध्ये इंटरेस्ट होता.. तेवढं माझ्यासाठि आणा म्हणुन मी पांघरुणात घुसुन समाधिस्त झाले..

कान्हा नॅशनल पार्क - भोरमदेव (भाग ५)

"इथुन भोरमदेव कडे जातानाच्या रस्त्यावर...आणि आपण तिथे जायचचं.. तुला वाघ दाखवायचाच.."
इतका वेळ सोडुन दिलेल्या आशा परत पल्लवीत झाल्या..शांत झालेली डोक्यातली चक्रं परत फिरु लागली.. आणि एकच सवाल परत घुमु लागला..

"दिसेल का?"......


दुसर्या दिवशी सकाळी ६ पर्यंत मला १० वेगवेगळे प्लान ऐकवण्यात आले होते.. किंवा एकाच प्लानचे, नवरा आणि दादा आणि हॉटेलचा मॅनेजर आणि आजुबाजुचे गावकरी लोक आणि ड्रायव्हरने २-३ दिवसात जमवलेले मित्र ह्या प्रत्येकाकडुन १ असे १० व्हर्जन्स सांगण्यात आले..

पैकी दादा आणि नवरा सोडुन बाकीच्यांना समजलेला (किंवा ज्याने त्याने आपापल्या कुवतीने अर्थ काढल्याप्रमाणे) प्लान असा की सकाळी लवकर उठुन कुठल्या तरी एका रस्त्याला लागायचे कारण तो रस्ता म्हणे कोअर जंगला मधुनच जातो पण रात्रभर बंद असतो. सकाळी ६ ला दोन्ही बाजूंची गेट्स उघडतात. थंडीमुळे वाघ व इतर प्राणी दव आवडत नसल्याने त्या रस्त्यावर उबेला येऊन बसलेले असतील तर दिसतील.. पण आपण जर लवकर गेलो तरच हे शक्य आहे कारण एकदा का रहदारी सुरु झाली की प्राणी जंगलात निघुन जातील..

कान्हा नॅशनल पार्क - वाघ....... (भाग ४)


आज आम्ही खुप काही पाहिलं होतं..अनुभवलं होतं.. पहिल्यांदाच जंगलात फिरलो होतो.. एक अविस्मरणीय अनुभव घेतला होता.. पण........... पण कान्हा मध्ये वाघ पहायची शक्यता मी आणि माझ्या नवर्‍यापुरती तरी संपली होती...

...हिरमुसुन परतलो.. कितीही नाही म्हणलं तरी मला वाघ पहायचा होताच हे मला स्पष्ट जाणवलं होतं..माझे डोळे जागोजागी काळे-पिवळे पट्टे शोधत होते..कान आजुबाजुच्या आवांजाचा वेध घेत होते..जीवच सगळा त्या वाघात गुंतुन गेला होता..कान्हाच हेच एक फार वाईट आहे..जिकडे तिकडे फक्त वाघाचीच चर्चा..वाघाचा गंध कान्हाच्या हवेत मिसळलाय..कान्हाच्या शांततेमध्ये त्याचा धाक आहे..लोकांच्या कुजबुजीमधुन त्याचं गुरुगुरणं ऐकु येतं...

कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३)


कान्हाला गेल्यावर सगळ्या वातावरणामध्ये एकच एक प्रश्न असतो.. "वाघ दिसणार का?"
कान्हा मध्ये एकुण ९०-१२० वाघ असावेत. ते संपुर्ण जंगलात कुठेही असु शकतात. पर्यटकांसाठी मु़ळातच ५-१०% च जंगल खुले आहे. त्यामुळे तुम्ही ४-५ तास ज्या भागात फिरणार, तिथे बरोब्बर त्याच वेळेला एखादा वाघ असण्याची शक्यता फार कमी. जंगलात जर तेव्हाच एखादी वाघीण पिल्लांसाठी म्हणुन एक दिवसा आड शिकार शोधत फिरत असेल..किंवा एखाद्या वाघाला कुरणात फिरायला आवडत असल्याने तो दाट जंगलात न रहाता बाहेर आला असेल..किंवा भर उन्हाळ्याचे दिवस असतील म्हणुन पाणी प्यायला बाहेर पडला असेल..किंवा थंडीमध्ये पहाटे गवतावर जे दव तयार होतं ते त्याला आवडत नाही म्हणुन तो रस्त्यावर येऊन बसला असेल..तर कदाचित तुम्हाला दिसेल..

कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २)



ट्रिप प्लान करायला सुरु केलं तेव्हाच "ट्रीप अॅड्व्हायझर" ला शरण गेले होते. खुप शोधाशोध केल्यावर एक निश्चित समजलं, ते म्हणजे आपलं भयंकर कन्फ्युजन झालेलं आहे. ३ गेट्स पैकी  कोणतं गेट निवडावं? कोणता झोन चांगला? सफारी म्हणजे काय? एका गेट हुन दुसर्‍या गेटला जायला म्हणे १ तास लागतो, मग हॉटेलमधुन एका गेट्वरुन दुसर्‍या भलत्याच गेटवर सकाळी ६ ला पोहचायचं कसं? असे एक ना दोन, हजार प्रश्न पडले..

म्हणलं मारो गोली.. जे हॉटेल बेस्ट,त्याच्या जवळचा झोन बेस्ट..म्हणुन चांगल्या हॉटेलवर लक्ष केंद्रित केलं. [१]

कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)

यंदा दिवाळीमध्ये शनिवार-रविवार जोडुन चक्क ९ दिवस सुट्टी मिळाली होती. अर्थातच ती घरात बसुन घालवण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे दिवाळीचा एक महिना आधी फराळापेक्षा ट्रिप प्लान करण्यातच जास्त वेळ गेला. अबीरला घेऊन पहिल्यांदाच जात असल्याने फार लांब जायचे नव्हते. शिवाय दिवाळीची बेसुमार गर्दी टाळायची होती. ह्या सगळ्या खेरीज एक छोटासा प्रॉब्लेम म्हणजे ४ सळसळणार्‍या रक्ताचे तरूण "कुठे जायचं" हे ठरवायला बसलेले असल्याने "एकमत" नावाचा इल्लुसा गड सर करायचा होता. ८-१५ दिवस रोज एक ह्या न्यायाने भारतभर फिरवुन झाल्यावर, जेव्हा बुकिंग करावेच लागतील अशी परिस्थिती आली तेव्हा  "मध्यप्रदेश - कान्हा जंगल" हे फायनल झाले. 

सगुणा बाग


यंदा माझ्या “रौप्य महोत्सवाच्या” निमित्ताने कुठे तरी फिरायला जावे अशी मीच टुम काढली.. घरची मंडळी पण भलत्याच उत्साहात चर्चा करू लागली. मी पण  तातडीने मि .पा  वर माहित असतील नसतील त्या सगळ्यांना व्य.नि करून टाकला आणि वर ही पण तंबी दिली की "सोबत १० महिन्याचा छोटा अबीर आहे तेव्हा त्या हिशोबाने काय ते सुचवा.." ५० राव, मोदक, बॅटमॅन सगळ्यांनी उत्साहानी ठिकाणे सुचवली.शेवटी भरपूर शोधाशोध करून "सगुणा बाग " हे ठिकाण निश्चित केले.खरं तर तिथे ट्रेननेच जायला पाहिजे,नेरळ स्टेशन वरून फक्त १० मिनिटा वर हे ठिकाण आहे. पण मी "अबीर ला झेपेल का? नाही जागा मिळाली तर त्याला घेऊन कुठे बसू? पण मग गर्दी पाहून तो घाबरला तर?" असे १०० प्रश्न विचारून सगळ्यांच्या डोक्याची मंडई केली.शेवटी दादाने चिडून "कार काढूया " असे फर्मान सोडले.(तसंही कुणीही शनिवारी सकाळी ७ ची ट्रेन पकडणार नव्हतंच).पण माझ्या वर खापर फोडून सगळे ७ ला निघायचं ठरवून ९ ला  कार मधून  निघाले.. मागच्या २ दिवसात सगुणा बागेतुनही फोन येऊन गेले होतेच.."कधी येताय? कसे येताय? घ्यायला गाडी पाठवु का स्टेशनवर?" इतकी व्यवस्थित चौकशी त्यांनी केली.

क्वीन!

परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. 

क्वीन! 

आवडला.. जाम आवडला.. 


क्वीन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय..


भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी..


तिचं लग्न मोडतं..