Saturday, 23 May 2015

क्वीन!

परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. 

क्वीन! 

आवडला.. जाम आवडला.. 


क्वीन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय..


भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी..


तिचं लग्न मोडतं.. 


 


भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. 


एक तर ते झालंच पाहिजे.. दुसरं ते जातीमध्येच झालं पाहिजे, मग गाढवाशी का होईना.. पण परजातीतील कर्तुत्ववान पुरुष सुद्धा त्या गाढवापुढे किस झाड की पत्ती..शिवाय लग्न योग्य वयातच झालंच पाहिजे नाही तर मग आख्या जगाला तुमची काळजी करावी लागते.. कारण लग्ना शिवाय आयुष्य म्हणजे.. छे.. उपमा देण्यालायक सुद्धा उरत नाही..


असं लग्न मोडलं म्हणजे तुम्ही खरं तर जीव द्यायला हवा.. कारण काहिही असो.. चुक मुलीची असते.. "आता आपलं कस्सं होणार" हा प्रश्न पण त्यांनाच पडायला हवा.. मुलांना ह्या चिंता नसतात..*


पण रानी "अब मेरा क्या होगा.." च्या गम मध्ये न डुबता चक्क स्वतःच्या हनिमुनच्या तिकीटावर पॅरिसला जाते..!

मला हेच्च लई लई आवडलं.. तिची कारणमीमांसा काही का असेना.. आयडिया भारी आहे..


तिथे गेल्यावर तिला खुप वेगळं आयुष्य पहायला मिळतं.. वेगळेच लोक.. त्यांच्या विचित्रच पद्धती.. मुल्य वेगळी.. विचार वेगळे.. त्यांनाही त्यांची दु:ख.. पण त्याची ओझी वाहताना कुणी दिसत नाही.. "दु:खाच्या अलंकरणाची दिप्ती.." बाजुला सारुन चक्क आनंदी रहाण्याची उलटीच रीत.. 


रानीला कुणी फालतु (भोचक) प्रश्न विचारत नाही.. रानी दारुच्या नशेत जी काही बकवास करते ते ही शांतपणे ऐकुन घेतल्या जातं.. स्वतःच्या (इन मिन छटाक) आयुष्यातुन आलेल्या अनुभवांमधुन सल्ले कुणी देत नाही..
सल्ले नाहीत?! गेलाबाजार "क्या पता..कल हो ना हो" टाईप कॅचलाईन्स पण नाहीत? मग लोकांची आयुष्य बदलणार कशी? अरे "बस उसकी एक बातने मेरी तो दुनियाही बदलदी" बॉलीवुडची बदाम सत्ती आहे.. इथेच तर गेम सुरु होतो ना जिंदगी बदलण्याचा... कशी बदलणार मग दुनिया आता? मीच हैराण..परेशान झाले...

किमान रानी स्वगता मधुन स्वतःला उलगडुन दाखवत आहे असं तरी दाखवायचं.. मग तरी प्रेक्षकांना समजेल पिक्चर आणि त्यातला अर्थ.. कारण प्रेक्षक चित्रपटातलं सगळ्यात मुर्ख पात्र असतं.. त्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स ची कोडी घालण्यावर बॉलीवुडचा विश्वास नाही.. त्यामुळे ह्या न त्या प्रकारे शब्दबंबाळ डायलॉग मधुन त्याला "जिंदगी".."मोहोब्बत"..विषयी तत्वज्ञान नाही दिलं तर मग घरी जाऊन त्याची जिंदगी कशी बदलणार?

पण इथे एकंदरीत कुणी कुणाला काहीच उलगडुन दाखवत नाही.. सगळेच समजुन घेतात.. 


रानी सगळा राग फक्त दात ओठ खाउन.. केस मोकळे सोडून नाचुन व्यक्त करते.. पुर्वी एकदा नातेवाईकां समोर नाचल्याबद्दल होणार्‍या नवर्‍याच्या शिव्या खाल्याचा प्रसंग आठवुन फक्त एक छ्द्मी हास्य.. बास.. आणि पुन्हा हंगामा हो गया..सुरु..


रानीला ३ मुलांसोबत रहावं लागतं.. आधी त्यांना घाबरलेली रानी नंतर चक्क त्यांची मैत्रीण होते.. एका स्ट्रिप क्लब मध्ये जाऊन नाचते.. गाडी चालवते..एका स्पर्धेत जाउन तिथल्या लोकांना पाणीपुरी खाऊ घालते.. एक लिप किस पण करते..


रानीला ह्या सगळ्या दरम्यान काही नवीन सापडत नाही.. फकत तिच्यात जो आत्मविश्वास आहे ह्याची तिला कल्पनाच नसते तो तेवढा सापडतो.. आता एवढी मोठी गोष्ट गवसल्यावर हिरोईन कशी आमुलाग्र बदलली पाहिजे.. बॉलीवुडमध्ये हिरोईन आमुलाग्र बदलते म्हणजे ती खरं तर ड्रेसची लांबी, केसांची हेअर स्टाईल आणि तोंडावरती अत्यंत सहनशीलच्या ऐवजी माजोरडे भाव एवढंच बदलत असते.. आणि हो मग तिनी १-२ तरी मोठे डायलॉग मारले पाहिजेत.. मग हिरो स्तब्ध व्हायला पाहिजे..मग ती ताडताड तिथुन निघुन जाणार..मग हिरोला उपरती व्हायला पाहिजे..


(हे उलटं ही होऊ शकतं.. हिरोईन कपड्यांची लांबी कमी करते.. मग हिरो तिला भारतीय संस्कृतीबद्दल ऐकवतो.. मग हिरोइन स्तब्ध.. मग हिरो ताडताड जाणार..हिरोईनला उपरती..)

इथेही हिरोईन बदलते आणि हिरोला उपरती होते.. फक्त मधल्या स्टेप्स घडत नाहीत.. म्हणजे कंगना अजुनही तिला कंफरटेबल वाटेल अशाच नॉर्मल कपड्यात असते.. सतत घट्ट उराशी बाळगलेला स्वेटर तेवढा काढते.. पण ते कदाचित तिची भीती ओसरत जाते तसं ती जात मोकळी होते हे दाखवण्या इतपतच.. ती कूणालाही स्तब्ध करत नाही.. अवाक करत नाही.. कुण्णा कुण्णाला तिच्या शब्दबंबाळ डायलॉगमुळे उपरती होते नाही.. कुणाचही आयुष्य एक पल मध्ये बदलत नाही..


बरं इथवर तरी ठिक आहे.. पण जेव्हा हिरोला उपरती होऊन तो रानी कडे येतो.. तेव्हा तरी "जिंदगी" आणि "मोहोब्बत" च्या फुलबाज्या उडणार असं मला वाटत होतं.. पण छे.. चांगली रडुन पडून "तुम ऐसा कैसे कर सकते हो मेरे साथ विजय????" असे आर्त प्रश्न विचारायचे सोडुन ही बया रॉक शो ला निघुन जाते.. कमाल आहे.. अरे प्यार सामने रो रहा है.. माफी की भीक मांग रहा है.. डायलॉग मारने की सुवर्णसंधी डायरेक्टर दे रहा है.. तर ह्या पोरीला पुन्हा कधी न भेटु शकणारे मित्र महत्वाचे वाटतात? "ये बाते हम दिल्ली मे भी कर सकते है.." असा लॉजिकल डायलॉग मारुन हिरोईन मित्रांना भेटायला जाते?? छे.. असं कुठे घडतं का? 


म्हणलं ठिके.. पण शेवटी "प्यार की च जीत" होत असते.. त्यामुळे तिथे तरी हरदासाची कथा मूळपदावर येईलच.. पण हे भगवान! आता जरी प्यार भीक मागत असला तरी उद्या ह्याच प्यार सोबत "लग्न" नामक गोष्ट झाल्यावर प्यार नवरा बनुन परत डोक्यावर मिर्‍या वाटणार, सासु घरात किटी पार्टी आणि पार्लर मध्ये अडकवणार हे संभाव्य धोके लक्षात घेऊन हिरोईन चक्क साखरपुड्याची अंगठी परत देऊन निघुन जाते.. 


काहीही म्हणजे अगदी काहीही झालं तरी बये लग्न आणि नवरा महत्वाचा ही "भारतीय संस्कृतीची" आणि प्यारे के आगे सब गुनाह माफ असतात ही बॉलीवुडची आम्हाला शिकवण आहे..त्यामुळे अगदी ऐन्वेळेस नवरा मुलगा मागे हटला तरी कुणी ना कुणी बोहल्यावर उभं राहुन "प्रसंग निभवायचा".. म्हणजे त्या अभागी मुली सोबत लग्न करायचं.. मग ती मुलगी आयुष्यभर त्याला परमेश्वर मानुन "मै धरा की धुल हूं" म्हणणार.. एक तर ही रानी घरात तोंड लपवुन बसायचं सोडुन पॅरिसला जाते.. तिथे चक्क आनंदात रहाते (दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? 


थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी.. त्यातही तु कितीही मॉडर्न असलीस (कितीही लहान कपड्यात वावरणारी बोल्ड अभिनेत्री = मॉडर्न, खुल्या विचारांची, स्वतंत्र स्त्री) तरी जेव्हा सवाल इश्क, मोहोब्बत का असतो तेव्हा तू डोकं गहाणच ठेवायचं असतं.. अगं स्वतःला आमुलाग्र बदलायला तयार होतात हिरवणी (म्हण्जे रिव्हर्स केस.. तोकड्या कपड्यातुन बॅक टु साडी फॉर हिरोज सेक..).. आणि तू चक्क माफी नाकारतेस हिरोला? अंगठी परत करतेस???


मी कानात प्राण आणुन आता एका मोठ्या डायलॉगची वाट पहात होते.. पण नाही.. "थँक्यु" व्यतिरिक्त चकार शब्द नाही.. काही मोठी मोठी स्पष्टीकरणं नाहीत.. शाब्दिक थोबाडित मारणं नाही.. आयुष्यभर गप्प बसुन पिक्चरच्या शेवटाला दुनियाभरची बडबड करुन समोरच्याला (आपल्याला बोलता येतं आणि १० ओळी सलग बोलु शकु एवढी अक्कल आपल्याला आहे हे दाखवुन) अवाक करण्याचा प्लान नाही.. "हमारा रास्ता जरुर एक है लेकीन मंजिल नही.." टाईप छळ नाही.. फक्त एक "थँक्यु".. विथ स्माइल..! ??


व्हाय???


हम्म.... आय गेस बिकॉज शी इज जस्ट "क्वीन".. ए क्वीन विदाऊट ड्रामा..!

*- हे सगळं माझं बॉलिवुड ग्यान आहे.. माझी मतं नाहीत.. त्यामुळे कुठल्याच मुक्ती मोर्चांनी माझ्यावर धावुन येऊ नये.. मी उत्तरं देत बसण्याचा टाईमपास करणार नाहीये..

No comments:

Post a Comment