यंदा माझ्या “रौप्य महोत्सवाच्या” निमित्ताने कुठे तरी फिरायला जावे अशी मीच टुम काढली.. घरची मंडळी पण भलत्याच उत्साहात चर्चा करू लागली. मी पण तातडीने मि .पा वर माहित असतील नसतील त्या सगळ्यांना व्य.नि करून टाकला आणि वर ही पण तंबी दिली की "सोबत १० महिन्याचा छोटा अबीर आहे तेव्हा त्या हिशोबाने काय ते सुचवा.." ५० राव, मोदक, बॅटमॅन सगळ्यांनी उत्साहानी ठिकाणे सुचवली.शेवटी भरपूर शोधाशोध करून "सगुणा बाग " हे ठिकाण निश्चित केले.खरं तर तिथे ट्रेननेच जायला पाहिजे,नेरळ स्टेशन वरून फक्त १० मिनिटा वर हे ठिकाण आहे. पण मी "अबीर ला झेपेल का? नाही जागा मिळाली तर त्याला घेऊन कुठे बसू? पण मग गर्दी पाहून तो घाबरला तर?" असे १०० प्रश्न विचारून सगळ्यांच्या डोक्याची मंडई केली.शेवटी दादाने चिडून "कार काढूया " असे फर्मान सोडले.(तसंही कुणीही शनिवारी सकाळी ७ ची ट्रेन पकडणार नव्हतंच).पण माझ्या वर खापर फोडून सगळे ७ ला निघायचं ठरवून ९ ला कार मधून निघाले.. मागच्या २ दिवसात सगुणा बागेतुनही फोन येऊन गेले होतेच.."कधी येताय? कसे येताय? घ्यायला गाडी पाठवु का स्टेशनवर?" इतकी व्यवस्थित चौकशी त्यांनी केली.
मुंबई -पुणे हायवे वरुन निघालो.हायवे सोडल्यावर नेरळ कडे जाणारा एक भयाण रस्ता लागला. आणि आम्हाला आपण रस्ता चुकलो की काय असे वाटू लागले. आयती संधी चालून आलीच आहे म्हणून बाबांच्या भलतीकडेच घेऊन जाण्याच्या आणि पत्ता न विचारण्याच्या सवयीवर आईने तोंडसुख घेणं चालू केलं. जेव्हा अबीर ने गळा काढला तेव्हा मग खरी चलबिचल सुरु झाली. एव्हाना सगुणा बागेच्या पाट्या दिसायला लागल्या होत्या. नेरळ गावच्या अरुंद रस्त्यातून गाडी एकदाची सगुणा बागेत पोहोचली.तोवर माझा जीव कधी एकदा ह्या कार्ट्याला बाहेर मोकळ्या हवेत नेते ह्या विचाराने कासावीस झाला होता. दाराशीच एका मुलीने आम्हाला नाव विचारून १ नंबर च्या Dormetory कडे पाठवले.. आणि तिथवर जाई पर्यंतच "आपण योग्य ठिकाणी आलो आहोत" असं माझं मत झालं..भरपूर झाडं..२-४ तळी..पाँड हाऊस..आमराई ..झुले.. ७ फुट उंच घोडे..खिल्लरी बैलांची जोडी.. शेणाने सारवलेली जमीन..शेतं पाहून गारगार वाटायला लागलं..सगळं कसं एकदम "बांबूचे घर..बांबूचे दार..बांबूची जमीन पिवळीशार..हाऊस ऑफ बॅम्बु sss ..." होतं..
डॉर्मेटरी मस्त होती.आधी मला वाटलं कि डॉर्मेटरी म्हणजे लोक बाथरूम बाहेर लाईन लावून उभे आहेत असं दिसणार.पण तसं काही नव्हतं.सगळी सोय असलेला छोटासा हॉल होता तो.शिवाय माळवद होते..समोर अंगण होते..शेतं दिसत होती.. झाडांना झुले होते..
जोरदार भूक लागली होतीच.पण आधी अबीर ची सोय पहायची होती.म्हणून नवर्याला पिटाळले थोडा भात किंवा पोळी मिळते का ते पहायला.५ मिनिटात नवरा माझे + अबीरचे जेवण होईल इतका भात,उकडलेलं कणीस आणि कस्टर्ड घेऊन हजर. म्हणलं "हे रे काय" तर म्हणे "त्यांनी दिलं एवढं..".. हा आणि असे अनेक धक्के मला इथे मिळाले.. कशाच्या बाबतीत मोजून मापून नाहीच.. अबीरसाठी दुध/जेवण काहीही आणि कितीही घेतलं/मागवलं तरी त्यांनी त्याचा हिशोब ठेवला नाही.उ लट बाटल्या उकळून दे.. दुध गरम करून दे अशीही मदत न कुरकुरता केली. जेवणाचा बेतही मस्त होता.पोळी, पालक पनीर, छोले, कस्टर्ड, सॅलड, ताक, वरण-भात आणि उकडलेले कणीस.चवही छान होती. दाबून जेवलो. आता एवढं जेवल्यावर थोडं चालुन येणं भागच होतं. म्हणुन जवळच पाण्यावर शिकारा सोडला आहे तिथे जाऊन बसलो. खरतर आल्यापासुनच नदीचे डोहाळे लागले होते. त्यामुळे घाई गडबडीने लोकं पाण्याकडे निघाले. मला नदीकडून फारशा अपेक्षा नव्हत्याच. कारण आम्ही गाडीतून पाहिलं होतं तेव्हा अगदीच थोडं पाणी दिसलं होतं. त्यामुळे मी फारशी घाई न करता निवांत शेतातून चालत होते.मंडळी मात्र पाण्यात पोहोचली होती..
शेतातून चालत गेल्या वर एक उतार लागतो आणि मग एकदम नदी दिसते.माझ्या तंद्रीत चालता चालता एकदम समोर नदी दिसली आणि मी थक्क झाले..अप्रतिम...दुसरा शब्दच नाही... सुंदर बांधलेला घाट, स्वच्छ नितळ पाणी ..इतकी सुंदर नदी मी पाहिलीच नाही.. ताबडतोब पाण्यात उड्या मारल्या..२-३ तास भरपूर खेळलो.. आम्ही खेळत असताताना तिथे सगुणा बागेचे मालक शेखर भडसावळे त्यांच्या परिवारासह आले. आमचा सावळा गॊंधळ पाहून त्यांनी आम्हाला पोहण्याच्या ३ सोप्प्या टिप्स दिल्या..मंडळी लगेच गुरुवार्यांना वंदून कामाला लागली. मला काही सूर बीर मारता आला नाही..पण थोडं फार जमलं.नवरा मात्र बर्यापैकी शिकला.
.. पाण्यात खेळुन दमून भागून बसले होते.. समोर नदीच निळशार पाणी होतं..सह्याद्रीचे डोंगर होते..झुकझुक गाडी जात होती.. मावळत्या सूर्याची किरणे पसरली होती..आजू बाजूला हिरवीगार शेतं डुलत होती..दूरवर एक भगवा फडकत होता..माझी भावंड पाण्यात खेळत होती..ज्यांच्या बरोबर मी माझा सगळा बालपण घालवलं..नवरा पाणी पाहून थुई थुई नाचत होता..आणि "बायको sss...हे बघ.."म्हणून पोहुन दाखवत होता..आई बाबा आमचं हे सगळं कौतुक पाहत होते.. आणि आमचा नंगु पंगु अबीर पाण्यात हात मारून खुश होऊन २ इवले दात दाखवत हसत होता..सूर्याची किरणं त्याच्या सोनेरी जावळा वर पडली होती...त्याचे केस वार्यावर भुरुभुरु उडत होते..आणि जगातली सर्वात सुखी व्यक्ती...मी... हा आनंद सोहळा "याची देही याची डोळा" पाहत होते...!! अरे अजुन काय हवं गालिब..!!
सूर्यास्त झाल्यावर दमून भागून आम्ही परत आलो.कोरडे होऊन मस्त चहा मागवला.आणि गप्पा मारत बसलो.खरंतर जेवणाची वाट बघत बसलो..!!८ ला जेवण आलं..आणि वाट पाहिल्याचच काय तर या मनुष्य देहाला धारण केल्याच समाधान झालं.तांदुळाची भाकरी, पिठलं,मसुराची डाळ,ठेचा,कैरीचे लोणचं,पापड,कांदा,सलाड,आणि सुंदर आटवलेली खीर.गरम गरम वरण भात होताच...आडवा हात मारला..तृप्त होऊन उशिरा पर्यंत गप्पा मारत बसलो.आमचे अजून २ नग मुंबई हून आले. त्यामुळे त्यांना काय काय केलं हे सांगून तुफान जळवलं..१.३० ला झोपी गेलो ते थेट ६.३० ला उठलो.लग्गेच आवरून,चहा घेऊन ८ ला नदीवर...!!!पुन्हा प्रचंड मस्ती केली..चित्र विचित्र फोटो काढले...लोकांना एव्हाना माझा वाढदिवस आहे याचे विस्मरण झाल होतेच.. (किंवा त्यांनी त्याचा विचार कारण सोडून दिलं..)आणि परत गाडी माझ्या वर घसरून ख्या ख्या ख्या सूरु झाले..मी गपगुमान पळ काढला..
परत येउन रुम सोडली आणि नाश्त्यावर तुटून पडलो. तो झाला की तळ्याकडे मासे मारायला प्रस्थान केले.मंडळी गळ लावून बसली..दर ५ मिनिटाला मासा मिळत होता आणि मी आरडा ओरडा करून तो पाण्यात सोडायला लावत होते.. पाण्याशिवाय नाही पण माझ्या आवाजमुळे हार्टअटॅकने तो मासा नक्की मरेल ह्या भितीने त्याला ताबडतोब पाण्यात सोडत होते.
मग लोक्स जाळे टाकून मासे पकडण्याच्या मोहिमेवर निघाले.मी मात्र दोन झाडांमध्ये बांधलेला..तळ्याकाठाचा झुला पाहून ताणून दिली.लोकं मध्येच किंचाळत होते..मासे मिळाल्याच्या आनंदात, पण मी साफ दुर्लक्ष करून पसरले.ती माश्याची तडफड मी बाप जन्मात पाहू शकणार नाही परत.
मग आम्ही भडसावळे ह्यांच्या घरी सरबत प्यायला गेलो..मला आधी कळेचना की असे कसे ते आपल्याला सरबत देतील.पण जाउन पाहिलं तर त्यांच्या अंगणात सरबताचे मोठे पिंप ठेवले होते.आणि लोक वाटेल तितके सरबत निवांत पीत बसले होते..पुन्हा एकदा मला धक्का बसला..मोजमाप नाही की काही नाही.. या आणि प्या.
ह्या नंतर आम्ही आमराई कडे कूच केले.सगळ्यांचा इरादा झुल्यावर लोळत पडण्याचा होता.पण आईने सगळ्याना शिव्या घालून उठवले. पकडा पकडी,विषाम्रुत,जोडसाखळी,डुक्कर मुसंडी असले प्रकार स्वत:सोबत खेळायला लावले.गुडघेदुखीच्या गोळ्या घरीच विसरल्या म्हणजे गुडघेदुखी पण घरीच विसरली असा समज तिने करून घेतला असावा.भरपूर पळापळी करून लोक दमून भागून बसले आणि आई मात्र "जरा तिकडे काय आहे ते पाहून येते" असं म्हणत तुरुतुरु निघून गेली.
एवढा वेळ लोक्स पळापळी करत होते म्हणून अबीर गप्प बसला होता.पण जसा हा करमणुकीचा कार्यक्रम थांबला तसा त्याने गळा काढला.मग आम्ही पण जेवणाकडे धाव घेतली.आजही जेवण छान होते पण एक ट्रिप आली होती म्हणून गडबड उडाली होती. मासे खाणारे जेवणाची फारच वाट पहात होते कारण त्यांनी सकाळीच माश्याची ऑर्डर दिली होती. माशाचा डबा समोर आला आणि त्यांचे चेहरे उजळले. पण डबा उघडल्यावर त्यांचे चेहरे पाहण्या सारखे झाले. महाराष्ट्रातील दुष्काळाची आठवण करून देणारे मरतुकडे मासे पाहून सगळ्यांचे पित्त खवळले आधी त्यांनी तिथल्या पोराला बोलवून विचारला की हे काय?? त्याने निरागसपणे सांगितले.. "तिलाप्या " .. "पण आम्ही तर रोहू मागितला होता" .."पण तो नाही ना मिळाला आज" ... "अरे हे काय कारण झाला का?" .."मी दुसर्या कुणाला तरी बोलावू का" असं म्हणून तो निघून गेला आणि ज्याने ऑर्डर घेतली त्याला बोलवलं. त्यानेही अशीच गमतीशीर उत्तरे दिली. एक तर मंडळीना भूक लागलेली. त्यात पित्त खवळलेलं.. पण समोर मासे बघून तोंड खवळलं.. त्यात वर बहिण म्हणाली "मी सांगते काय होणारे..तो हे मासे घेऊन जाणार.पैसे नाही घेणार.हे मासेही नाही मिळणार.कारण आता तो रोहू कुठून आणणार?" असं म्हणाल्या बर्रोब्बर लोक्स भानावर आले आणि "जाऊ दे.. मासे तर आहेत ना..होतं असं कधी कधी.." अशा भूमिकेवर आले.. !!
जेवणानंतर "स्नेक शो" झाला.नेमकी अबीर बाजूच्या अनोळखी माणसाच्या शर्टची बाही ओढून खाण्याच्या प्रयत्नांत होता.त्यामुळे मी त्याच्या मागे होते.पण नवरा मध्येच "बायको कोब्रा पाहिलास का ?" असं विचारत होता.त्यामुळे कोब्रा असावा तिथे.त्यानंतर "अभिप्राय" विचारणारा फॉर्म आला.आई लग्गेच सरसावून लिहायला बसली.सर्व काही चान चान च होते फक्त मासे खाणारे लोक नाराज होते.मी "जे तुला वाटतंय तेच मला वाटतंय " सांगून मोकळी झाले. नवरोबा "constructive critisism" वर घसरला आणि फर्ग्युसन मध्ये शिकलेला (आणि म्हणून ३७ % सदाशिव पेठी )भाऊ म्हणाला "जे मागवले ते मासे मिळाले नाहीत एवढंच लिही"...इतकं सरळ लिहील ती मराठी/संस्कृतची शिक्षिका कसली." जेवण सात्विक होतें, मात्र मत्स्याहारी लोकांच्या पदरी मात्र निराशाच ..." असं काही तरी अलंकारिक लिहित बसली..
आता मात्र निघायचे वेध लागले होते.सगळे सामान घेऊन गाड्यांमध्ये टाकले.ग्रुप फोटो काढला.अबीरला घेऊन बैलगाडीत बसले.म्हणलं हेच राहिलंय तेवढीही ट्राय करू.दोन मिनिटातच पोरगा जिवाच्या आकांतानी घट्ट मिठी मारून, डोळे मिटून बसला.आमचा जीव सदैव टांगणार्या मुलाला फॉर अ चेंज घाबरलेला पाहुन मजा आली.. दाराशी कार होतीच.. तृप्त मनाने आम्ही पुण्याकडे निघालो..!!
२७ मार्च २०१३
No comments:
Post a Comment