रामेश्वरमहुन परत आल्यावर खरं तर कुठेही जाण्याची परिस्थिती नव्हती.. पण मीनाक्षी अम्माच्या मंदिरातल्या घंटा वाजु लागल्या.. आणि पाय आपोआप तिकडे वळाले..
दोन वर्षांपुर्वी नवरा चैन्नईला आला होता तेव्हा का कोण जाणे त्याने "रामेश्वरमला जाऊन येतो" असा हेका धरला होता. मला तेव्हा तामिळनाडु.. तिथली मंदिरं ह्याबद्द्ल फारशी काहीच माहिती नव्हती.. धनुषकोडीबद्दल ऐकलं तेही तेव्हाच. थोडं गुगलुन पाहिल्यावर मी त्याला जाता जाता मग तंजावर आणि मदुराई तरी करच असा सल्ला दिला. कुरकुर करत साहेब मदुराईला गेले खरे.. आणि परत येताना मदुराईच्या प्रेमात पडुन आले..!
प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही मदुराईला फार कमी वेळ दिला. आम्हाला फक्त मीनाक्षी मंदिर पहायचे होते. ते काय होईल २-४ तासात पाहुन म्हणुन आम्ही पुढचं वेळापत्रक आखलं. पण प्रत्यक्षात पुन्हा पुन्हा पहात रहावं.. वेळ काढुन निवांत फिरत रहावं.. दिवसा उजेडीच नाही तर रात्रीच्या वेळीसुद्धा जाऊन पहायलाच हवं असं हे मंदिर आहे..! इतकंच नाही तर तिथला राजमहाल सुद्धा अत्यंत मह्त्वाची वास्तु आहे. आम्ही इतका विचार केलाच नाही. एकतर गाडी चुकल्याने आमची वेळेची गणितं फसली. त्यामुळे रात्रीच्या वेळेस मंदिर फार पहायला मिळाले नाही. राजमहाल आम्ही पाहिलाही असता पण मीनाक्षी मंदिर पाहुन तेवढा वेळ आणि शक्ति उरलीच नाही..
अर्थातच धनुषकोडी आणि मदुराईला परत परत जायचा इरादा पक्का आहे.. तेव्हा राहिलेली सगळी कसर पुरी करणार हे नक्की!
आता मीनाक्षी मंदिराबद्दल थोडेसे..
मलयध्वज पांड्य राजा आणि त्याची पत्नी कांचनमलाई ह्यांना एका यज्ञातुन प्राप्त झालेली कन्या म्हणजे मीनाक्षी! हिला जन्मतः तीन स्तन असल्याने राजा चिंतेत पडला. पण मीनाक्षी जेव्हा तिच्या भावी वराला भेटेल तेव्हा हा स्तन गळुन पडेल अशी आकाशवाणी झाली. मीनाक्षी मोठी झाल्यावर पांड्य राज्यावर राज्य करु लागली. साम्राज्य स्थापन करण्यासाठी तिने युद्ध करुन ब्रह्मलोक, विष्णुलोक आणि इंद्रलोक जिंकला. कैलास जिंकण्यासाठी आल्यावर मात्र जेव्हा ती शिवाशी लढायाला आली तेव्हा शिवाचे रुप पाहुन पहिल्यांदाच तिच्या मनात लज्जा निर्माण झाली आणि तिचा तिसरा स्तन गळुन पडला. पुढे तिचा शिवाशी विवाह झाला. तोच हा सुंदरेश्वर! (द्राविडी लोक त्याला "छोक्कलिंगम" म्हणतात.)
मीनाक्षी मंदिर हे मुळ पांड्य राजाच्या काळात बांधले गेले असावे. पण ते मलिक काफुरच्या आक्रमणात जवळ जवळ नष्ट झाले. तिरुमल नायकाने हे मंदिर पुन्हा बांधुन घेतले. मीनाक्षी आणि सुंदरेश्वराची मुळ मुर्ती सोडता बाकी सर्व भाग सोळाव्या शतका नंतर बांधलेला आहे.
मीनाक्षी मंदिर अत्यंत भव्य असुन त्याच्या सभोवताली तटबंदी आहे. चारी दिशांना गोपुरे आहेत. दक्षिणेकडील गोपुर सर्वात मोठे असुन, सर्वच गोपुरांवर देवदेवतांची शिल्पे आहेत. मंदिरात मीनाक्षीचे मंदिर, सुंदरेश्वराचे मंदिर, अनेक सभामंडप, जलाशय आणि लहान मोठी मंदिरे आहेत.

* हे चित्र आंतरजालावरुन साभार
मंदिरात प्रवेश करताना चप्पल-बुट, कॅमेरा, इ वस्तु बाहेर जमा कराव्या लागतात. मंदिरात कॅमेरा नेता येत नाही पण १००/- भरुन मोबाईल कॅमेरा वापरा येतो. ह्या मंदिरात कपड्यांचेही नियम आहेत. संपुर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे लागतात, गुडघ्यापासुन वर दुमडलेली अण्णा स्टाईल लुंगी चक्क चालत नाही. आता मध्ये फक्त हिंदुना प्रवेश आहे.
प्रवेशद्वार
एका भल्यामोठ्या लाईन मध्ये उभे रहावे लागते.लाईन मधुन फिरता फिरता दिसणारा सभामंडप आणि खांबावर कोरलेली शिल्पे. रामेश्वरम प्रमाणेच इथेही छतावर पुष्कळ रंगकाम केले आहे.
मंदिरात फक्त सभामंडपात फोटो घेता येतात, त्यामुळे एकदा तो सोडला की आत कितीही अप्रतिम कलाकुसर दिसली तरी फोटो घेता येत नाहीत. आम्ही फास्ट लाईनच्या तिकिटामुळे १० मिनिटात गाभार्यापाशी आलो. जिथे मीनाक्षीची मुर्ती आहे तो मंडप केवळ अवर्णनीय...
काळ्या दगडातुन घडवलेले मंदिर.. प्रकाशासाठी बांधलेले झरोके आणि त्यातुन येणारे सुर्यकिरण.. मंडपात योजलेला पिवळ्या रंगाचा प्रकाश.. गाभार्याभोवती पाणी फिरवण्यासाठी किल्ल्या भोवती जसे खंदक असतात तशी व्यवस्था.. गाभार्याच्या बाहेरच्या भिंतींवर सोडलेल्या पितळी समया.. त्यात मंद तेवणार्या वाती.. आणि त्यांच्या प्रकाशानी उजळेल्या देव देवतांच्या मुर्ती.. त्यांना नेसवलेली रेशमी वस्त्रे... केवळ अवर्णनीय...!!!
आणि ह्यावर कहर म्हणजे खुद्द मीनाक्षीची कमनीय मुर्ती... असं देवाच्या मुर्तीला "वाह! क्या बात है!" किंवा "ला ज वा ब!" म्हणता येतं का ते माहित नाही.. पण त्या मुर्तीचे वर्णन करायला शब्द तोकडे आहेत. काय त्या चेहर्यावरचे भाव.. काय ती नजाकत.. काय ती उभं रहण्याची ढब..! हे शिल्प मी आजवर प्रत्यक्षात.. फोटोमध्ये.. कुठेही पाहिलेल्या शिल्पांमधले सर्वोत्कृष्ट शिल्प आहे.
ती मुर्ती मनोहारी म्हणावी की ज्या पद्धतीने तिचा साज शॄंगार केला तो जास्त मोहक म्हणावा..! फक्त दिव्यांच्या प्रकाशात उजळेलेली मुर्ती, तिला नेसवलेली रेशमी वस्त्र, तिला घातलेले फुलांचे हार, तिच्या समोर ओवाळला जाणारी पंचारती आणि हे सगळे सोहळे जिच्यासाठी ती मीनाक्षी अम्मा! कितीही पाहिलं तरी मन भरत नाही...
तिथेच फतकल मारुन बसावं आणि अम्माकडे पहात रहावं असं वाटलं तरी ते तसं करु देत नाहीत, हाकलतातच.. नाईलाजानी बाहेर आलो. पुढे सुंदरेश्वराचेही दर्शन घेतले.
बाहेरच्या सभामंडपात एकाहुन एक अप्रतिम मुर्ती आहेत. पण मीनाक्षीच्या मुर्ती पुढे मला आता काय लिहावे ते सुचत नाही म्हणुन फक्त फोटो देते.
मंदिराचा परिसर
मंदिरातुन बाहेर पडल्यावर साड्यांची अनेक दुकाने आहेत. मदुराईमध्येही चांगल्या साड्या मिळतात. मदुराईअचा दालवडा जागतिक दर्जाचा खतरनाक चविष्ट पदार्थ आहे. सकाळी नाश्त्याला इथल्या इडल्या, वेगवेगळ्या प्रकारचे वडे आणि कॉफी!!! पोळ्यांच्या विरहात आम्ही मदुराई रेसिडेन्सी नावाच्या महागड्या हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये ५०/- ला एक ह्या प्रमाणे वाईट्ट तंदुरी रोट्या खाल्ल्या. चेट्टिनाड नावाने एक भाजी घेतली ती ही बेचव पाण्यात तरंगणार्या भाज्या अशी निघाली. पण मंडळींचे मॉरल टिकवायला त्यांना भात सोडून काहीतरी खाउ घालणं आवश्यक होतं!!
मदुराईचा राजमहाल सुद्धा अगदी आवर्जुन बघावी अशी वास्तु आहे पण दुर्दैवाने आम्ही ती पाहु शकलो नाही. संध्याकाळच्या तामिळनाडू स्टेट ट्रान्स्पोर्टच्या गाडीने कोईंबतोर गाठले.
देव देव करुन झालं होतं.. आता कांचीपुरम साड्या खुणावत होत्या!!! धार्मिक वातावरणातुन मंडळी भौतिक जगात परतली होती.. मोजुन मापुन ठरवलेल्या बजेट टुरच्या बजेट्ला पार होत्याच नव्हतं करुन टाकणारा दिवस आलेला होता!
मंडळी कोइंबतोरच्या लक्ष्मी रोडवर येऊन धडकली होती.....!
क्रमशः
(तळटीप:- हा भाग लिहीताना मीनाक्षी मंदिराच्या माहितीसाठी मराठी विश्वकोश-खंड १२ तसेच विकिपिडिया वापरलेला आहे. )
No comments:
Post a Comment