Saturday, 23 May 2015

कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)

यंदा दिवाळीमध्ये शनिवार-रविवार जोडुन चक्क ९ दिवस सुट्टी मिळाली होती. अर्थातच ती घरात बसुन घालवण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे दिवाळीचा एक महिना आधी फराळापेक्षा ट्रिप प्लान करण्यातच जास्त वेळ गेला. अबीरला घेऊन पहिल्यांदाच जात असल्याने फार लांब जायचे नव्हते. शिवाय दिवाळीची बेसुमार गर्दी टाळायची होती. ह्या सगळ्या खेरीज एक छोटासा प्रॉब्लेम म्हणजे ४ सळसळणार्‍या रक्ताचे तरूण "कुठे जायचं" हे ठरवायला बसलेले असल्याने "एकमत" नावाचा इल्लुसा गड सर करायचा होता. ८-१५ दिवस रोज एक ह्या न्यायाने भारतभर फिरवुन झाल्यावर, जेव्हा बुकिंग करावेच लागतील अशी परिस्थिती आली तेव्हा  "मध्यप्रदेश - कान्हा जंगल" हे फायनल झाले. 


मला वाटलं झालं..शंपss..पण नाही.. ट्रिप प्लानिंग हे दिव्य अजुन व्हायचे होते. बाकी सगळे गडी फार कामाचे असल्याने गायब झाले आणि मीच काय ती रिकामी असल्याने प्लानिंग माझ्याकडे आले. कान्हा नक्की कुठाय हे शोधण्यापासुन सुरवात झाली. एक चक्कर मध्यप्रदेश टुरीझम मध्ये पण मारुन आले. तिथले भयंकर रेट्स ऐकुन हैराण झाल्यावर, आता आलोच आहोत तर रिकाम्या हातानी जायचं नाही म्हणुन मध्यप्रदेशचा मोठा नकाशा आणि एम्.पी टुरिझम च्या सगळ्या जागांची पत्रकं घेउनच आले. डेस्क वरच्या डायर्‍या, पर्स आणि कंप्युटर ह्यांना तुच्छपणे मागे सारुन मस्त पैकी नकाशा पसरला आणि नक्की ह्या एम्.पी मध्ये आहे तरी काय काय हे बघायला सुरवात केली. जस जशी ठिकाणं सापडत गेली तस तसे मी "अबीर-गर्दी-जवळची ठिकाणं" वगैरे विसरुन आणि ऑफिसचा बेसुमार वेळ ह्या कामामध्ये घालवुन, ८ दिवसांची "नागपुर्-जबलपुर्-कान्हा-झाशी-खजुराहो-नागपुर" अशी भरगच्च ट्रिप तयार केली!!!

लग्गेच मस्त एक्सेल बनवुन बाबांना पाठवली आणि बाबांनी लगेच कॉल करुन "मी अबीर आणि बाकी ७-८ जणांचं लटांबर घेउन रेल्वे स्टेशनवर येणार नाही" ह्या कारणाखाली "नागपुर-कान्हा-नागपुर" अशी ती कटशॉर्ट पण केली..

बाबांचा एकंदरीत सुर पाहता जास्त आग्रह केला तर बाबा "हॉल्-बेडरुम्-किचन-हॉल" अशी ट्रिप दिवाळीभर करवतील ह्याची मला (अनुभवातुन आलेली) खात्री होती.  मी मुकाटपणे एक्सेल एडिट केली आणि जड अंतकरणानी "खजुराहो" डिलीट केलं..

पुढच्या एक महिन्यात मी "ट्रिप प्लानिंग" च्या नावाखाली वेठबिगारा सारखी राबले.. काही दिवसांनी मी आहे ती नोकरी सोडुन मध्यप्रदेश टुरीझमच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले असते तरी चाललं असतं एवढी माहिती मी गोळा केली. पण जनहितार्थ त्यातली मुद्द्याची तेवढी इथे देते आणि ती गोळा करताना आलेले रोमहर्षक अनुभव सांगायचे टाळते...( कोण म्हणालं हुश्श्श्??? )

कान्हा नॅशनल पार्क , मध्यप्रदेश ह्याच्याशी संबंधित माहिती तुम्ही गुगलुन काढालच त्यामुळे ती देत बसत नाही. कान्हाला जाताना जी माहिती हवीच तेवढी देते.

कान्हा हे जबलपुर जवळ असणारे (१७० किमी) मध्यप्रदेश मधील, वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. हे अभयारण्य फक्त १६/१८ ऑक्टोबर - ३० जुन पर्यंत पर्यटकांसाठी चालु असते. इथे जाण्यासाठी ३ गेट्स आहेत :- १. मुक्की २. किसली ३. कान्हा . ह्यात कान्हा, मुक्की, किसली आणि सारही हे ४ झोन आहेत जिथे तुम्ही जाउ शकता. दर बुधवारी  दुपारी जंगल बंद असते. जंगलात जाण्यासाठी "सफारी" बुक करावी लागते. ही सफारी हॉटेल बुक करुन देतात किंवा आपण ऑनलाईन करु शकतो.

ऑनलाईन सफारी बुकिंगः-
१. ही साईट वापरुन तुम्ही ऑनलाईन बुकींग करु शकता

२. कान्हा व्यतिरिक्त मध्यप्रदेश मध्ये पन्ना, पेंच आणि बांधवगढ हेही नॅशनल पार्क आहेत. त्याचेही बुकिंग इथेच होते.

३. सफारी म्हणजे मोठ्या उघड्या जीप मधुन तुम्हाला जंगलात फिरवतात. ह्यात घाबरायचे काही कारण नसते. जनावरे हल्ला करत नाहीत.

४. एका सफारीमध्ये तुम्ही ६ जण जाऊ शकता. दिड वर्षापेक्षा लहान बाळांना नेता येत नाही, नेऊही नये.

५. सफारी २ वेळेत होते:- सकाळी - ६-१२ आणि दुपारी ३-६.

६. एकदा का जीप मध्ये बसलं की खाली उतरता येत नाही. सकाळच्या सफारीमध्ये एक ब्रेक घेतात. जंगलात एक कँटिन आहे तिथे थांबवतात. इथे चहा व नाश्ता मिळतो.

७. जंगलात जातानाचे काही नियम आहेत (जसे की भडक रंगाचे कपडे घालु नयेत) ते वाचुनच जावे.

८. सफारीच्या तिकिटामध्ये फक्त प्रवेश मिळतो. जीप तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन बुक करावी लागते. हॉटेल मधुन हे बुकिंग होते. १ किमी ला १०० रु घेउन जीप हॉटेलच्या दाराशी येते. (जसे की आमचे हॉटेल मुक्की गेट पासुन ५ किमी वर होते. ५००/- जास्त घेऊन सकाळी ५.३०-६ ला जीप दारात येई. अर्थात आमच्याकडे स्वतःची गाडी होती. त्यामुळे हा खर्च वाचु शकला असता.) ह्या गाडी सोबत एक गाईडही असतो. (ह्या बद्दल एकंदरीत सिस्टीम चांगली केली आहे). हा तुम्ही निवडु शकत नाही. सगळे काही वनखात्याच्या अखत्यारित आहे.

९. ह्या सफारीचा खर्च तुम्ही कोणत्या झोन मध्ये जात आहात, कधी जात आहात आणि गाडी कुठुन घेत आहात (गेट की हॉटेल) ह्यावर अवलंबुन आहे. आम्ही कान्हा झोनची सफारी ४३०० मध्ये केली आणि मुक्की झोनची ४०००. (प्रवेश फी + गाडी (ह्यात ड्रायव्हर+गाईड येतातच) ) रेट्स बदलत असतात. [वनखात्याचे नियम एकंदरीत सतत बदलत असतात]

१०. जाताना सोबत प्रत्येकाचे आयडि प्रुफ सोबत ठेवा. (प्रत्येकाची जन्म तारीख आणि कोणते आयडी प्रुफ सोबत ठेवणार आहात, त्याचे नंबर इ. माहिती बुकिंग करताना लागते. मी फक्त टिम लीड म्हनुन एकाचीच ही सगळी माहिती भरली. बाकीच्यांची फक्त नावं लिहीली. त्यामुळे आम्हाला गेटवर अडवले. पण मग सगळ्यांकडे प्रुफ आहेत हे पाहुन, अर्ज लिहुन द्यायच्या बोलीवर सोडले. अर्ज काही लिहुन घेतला नाही. पण एकंदरित ही माहिती फॉर्मवर भरुन ठेवलेली चांगली).

११. सफारी बुक करतानाच सगळे डिटेल्स तयार हवेत :- किती आणि कोण कोण, कधी जाणार. जे ६ जण एकत्र जाणार त्यांची नावे व इतर माहिती जवळ हवी. हा फॉर्म असा दिसतो.



नंतर लोक कमी-जास्त करता येतात, पण ते खर्चिक काम आहे.

आम्ही नागपुरला जाऊन, तिथुन गाडी करुन जायचा प्लान केला. गाडी नेउन परत पाठवण्यापेक्षा ती ४ दिवस सोबत ठेवणे परवडते. विमानतळावरच ज्याच्याशी १ महिना फोनवर बोलुन गाडी ठरवली होती त्या माणसाने (त्याला आपण गटणे म्हणुया) ड्रायव्हरचा नंबर दिला. ड्रायव्हरने पर डे १०००/- जास्त मागितले. आम्ही परत गटणेला फोन केला. ही बातमी ऐकुन सशाच्या काळजाच्या गटणेने फोनच बंद करुन ठेवला. इकडे परत डायवरला फोन केला तर त्याने "मी दुसरे गिर्‍हाइक घेतले आहे" हे शुभ वर्तमान दिले. ८ जण, २ चिल्ल्या पिल्ल्यांसह आणि अगणित बॅगांसह विमानात चढत होते. पण नागपुरला पोहचुन ऐन दिवाळीत आपण कान्हाला कसे जाणार हा प्रश्न थोबाडावर होताच. मग सगळ्यांनी आहे नाही ती पुण्याई कामाला लावुन नागपुरमध्ये असणार्‍या प्रत्येक परिचिताला फोन लावायला सुरवात केली. खुप फोनाफोनी नंतर विमानात बसल्यावर "गाडी मिळाली.. कॅरिअर सकट" असा कॉल आला.. आणि आता लोक्स मला मारणार नाहीत म्हणुन मी सुटकेचा निश्वास सोडला...

नागपुर-कान्हा प्रवास  (~३०० किमी) हा एक संपुर्ण वेगळा विषय आहे, त्यावर एक लेख होईल. (ज्यात ९०% शिव्या असतील..) काय घोडं मारलय आपण सरकारचं की असले रस्ते करुन ठेवलेत देव जाणे.. तरी महाराष्ट्रातले रस्ते उत्तम म्हणावे असे मध्यप्रदेश मधले रस्ते. मध्येप्रदेश बॉर्डर क्रॉस केली की डांबरी मोठे रस्ते संपुन अचानक लहान मातीचे कच्चे रस्ते सुरु. long story short.. ४ वाजता नागपुर सोडलं आणि उजाड, वैराण , अंधार्‍या रस्त्यांवरुन आम्ही रात्री २ ला कान्हाला पोहोचलो.. आता बोला..

त्यात थोडीशी गंमत अशी झाली की ज्या हॉटेल मध्ये आम्ही राहाणार होतो, तिथल्या लोकांनी १००० वेळा सांगुनही आम्ही "परसवाडा" वरुन आलो नाही.. कारण अर्थातच रात्रिची वेळ, सोबत बायका पोरं आणि नक्षलवाद्यांची भिती. त्यमुळे दुसरा रस्ता ज्याने आम्ही आलो तो नेमका भयंकर वाईट (आणि नक्षलावाद्यांवला मक्खन...!) इतका वेळ गाडीत बसलो होतो की अजुन थोडी गाडी पुढे नेली तर हिमालयात पोहचु असं वाटायला लागलं..

आम्ही गेलो तो रुट :- नागपुर - भंडारा - तुमसर - गोंदिया - बालाघाट - बैहर - मुक्की गेट (कान्हा)

असं जायला हवं होतं :- नागपुर - भंडारा - तुमसर - गोंदिया - बालाघाट - परसवाडा - बैहर - मुक्की गेट (कान्हा)



ह्या तापात दोन गोष्टी चांगल्या होत्या. १. आमचा ड्रायव्हर २. आमचं हॉटेल.
आमच्या देवमाणुस "दिलीपभाऊंनी" एकदाही कटकट न करता आणि छताला न टेकवता आम्हाला सुखरुप आमच्या हॉटेलमध्ये पोहोचवले. आमचे हॉटेल - मुबा अ‍ॅट मुक्की.

ह्या हॉटेल बद्दल अत्यंत चवीचवीनी आणि निवांत बोलायला पाहीजे.. इतक्या सुंदर अनुभवाचा इतका मान राखलाच पाहिजे.. त्यामुळे ते पुढच्या भागात.. तोवर तुम्ही वाचा ह्या हॉटेल बद्दलचे ट्रिप अ‍ॅडव्हायझर वरचे रिव्ह्युज.

१६ जानेवारी २०१४

No comments:

Post a Comment