Sunday, 24 May 2015

सफर तामिळनाडुची! - रामेश्वरम (भाग २)



शनिवारी संध्याकाळी आम्ही मदुराईला पोहोचलो.. वातावरण ढगाळ होतं.. थोडा थोडा पाऊसही चालु होता...आणि धनुषकोडीला जाऊन सुर्योदय पहायचं स्वप्नं त्या पावसात केव्हाचं वाहुन जाऊन एव्हाना रामेश्वराच्या चरणी पोहोचलं होतं.. आता मात्र पुढंच कसं करावं ह्याचा विचारही करवत नव्हता..

नवरा आधीच इथे एकदा येऊन गेल्याने त्याला मदुराई आणि रामेश्वरमची माहिती होती.. मागच्या वेळेस तो जिथे राहिला त्या "कावेरी महल" मध्ये जायचं होतं.. एकतर आमचा मदुराई की रामेश्वरमला मुक्काम हेच डळमळीत असल्याने आणि नवरोबांना आपण सोडुन जग्गात कुण्णी कुण्णी म्हणुन कावेरी महलला जाणार नाही ह्याची खात्री असल्याने बुकींग केलं नव्हतंच.. रिक्षात बॅगा टाकुन मी आणि नवरा साबांना घेऊन पुढे गेलो.. आमचं नशिब थोर असल्याने कावेरी महल फुल्ल होतं! मग पुढचा अर्धा तास "मदुराई की गलियोंमे" फिरण्यात गेला. अखेरीस पुढच्याच गल्लीत "हॉटेल एम्पी" सापडले..



वास्तविक आम्ही काही फाइव्ह स्टार वगैरे हॉटेल शोधत नव्हतो.. ना आमच्याकडे वर तोंड करुन बोलायला कुठलं बुकींग होतं.. पण तरीही... "हॉटेल एम्पी" हे सात भिकार हॉटेल आहे हे मी सगळीकडे नोंदवुन ठेवते.. रया गेलेल्या रुम्स.. मोठे मोठे पण टणक गाद्यांचे बेड्स.. त्यावर कळकट बेडशीट्स.. अंघोळीला गार पाणी.. स्लो सर्व्हिस..आणि त्यामानानी रुमचे भाडे मात्र दणकट इ. अनेक मुद्दे होते.. पण नाविलाज को क्या विलाज...

पुढचे दोन दिवस वातावरण तसेही पावसाळी असणार होते.. दिराला फक्त रविवारी येणे जमणार असल्याने दुसर्‍याच दिवशी सकाळी उठुन ७ च्या पॅसेंजरने रामेश्वरमला जायचे ठरले आणि मंडळींनी ताणुन दिली..

झोपा मस्तच झाल्या असणार कारण उठलो तेव्हा ६.१५ होऊन गेले होते!! ५ माणसांना अंघोळी करुन स्टेशनवर न्यायचे होते.. बाहेर दणादण पाऊस!! धावपळ करत, कुर्मगतीने चालणार्‍या आणि १ किमी साठी ५०/- घेणार्‍या थुत्तरछाप रिक्षातुन स्टेशनवर गेलो.. मी, साबु, साबा नी अबीर कडेवर असे पळत होतो.. दिर न नवरा तिकीट आणि नाश्ता ह्यांच्या भानगडीत होते.. जागोजागी हजारो पाट्या होत्या.. पण प्लॅट्फॉर्म नबंरची पाटीच नाही.. तिथे एका पोलीसाला विचारल्यावर त्याने  पलीकडच्या फलाटाकडे बोट दाखवले.. आम्ही रेल्वे ट्रॅक तसाच ओलांडुन पलीकडे गेलो.. आणि आमच्या डोळ्या देखत रामेश्वरमची पॅसेंजर त्याच्याही पलीकडच्या फलाटावरुन हलली!!!

तामिळनाडु... तिथली लोकं.. त्यांचा पाट्या न लावण्याचा मुर्खपणा.. तो पोलीस.. आणि आपण स्वतः सोडुन बाकी इतर अशा समस्त जनांना शुद्ध मराठीत आणि "स्वर टिपेचा" लावुन शिव्या घातल्या.. चुकांचं खापर वरील सर्वांवर फोडलं.. आणि मंडळी आक्खं मदुराई रेल्वे स्टेशन डोक्यावर घेऊन मगच स्टेशनबाहेर पडली..

भरपुर शोधाशोध करुन, मदुराईच्या चक्रम लोकांशी हुज्जत घालुन शेवटी एका रिक्षात बसलो आणी जगाच्या दुसर्‍या टोकाला असणार्‍या बस स्टॅण्डला गेलो. मदुराईत म्हणे ५ बस स्टॅण्ड आहेत. प्रत्येक स्टॅण्ड वरुन विशिष्ट गावच्याच गाड्या सुटतात. आमचं नशीब अजुन जोरात असतं तर ते पाचही स्टॅण्ड फिरुन शेवटी आम्ही इष्ट स्थळी पोहोचलो असतो.. पण दुर्दैवानी पहिल्याच फट्क्यात योग्य ठिकाणी नेऊन सोडलं बाबा रिक्षामालकांनी!!

८ ची गाडी.. २.३०-३ तासात रामेश्वरम.. म्हण्जे ११ ला जरी पोहोचलो तरी अजुन एक मज्जा अशी होती की रामेश्वराचं मंदिर दुपारी १२ ला बंद होतं म्हणे.. म्हण्जे एका तासात पळत जाऊन ते मंदिर पाहुन बाहेर येणं आवश्यक होतं... आता जे होईल ते होईल असं म्हणुन निघालो.. रस्ता छान होता.. ढणाढणा गाणी वाजत होती.. पण त्याचंही काही वाटु नये इतकं छान वातावरण होतं.. पाऊस नव्हता पण कडक ऊनही नाही.. आल्हाददायक अगदी.. छोट्या छोट्या गावांमधुन बस जात होती. तामिळनाडु मधले वर्ल्ड फेमस फ्लेक्स जागोजागी झळकत होते! कशाबद्द्ल फ्लेक्स लावलाय हे कळत नव्हतं पण डेंजर फोटो होते एकदम..

टुमदार गावांमधुन जाताना आता समुद्राचा खारा वास यायला लागला.. कधी एकदा ही बस थांबते आणि पळत जाऊन समुद्र बघते असं झालं.. रामेश्वरममध्ये शिरताना हा पंबन ब्रिज लागतो.



पंबन ब्रिज भारतातला पहिला आणि सर्वात मोठा (आता बांधलेला वरळी सी लिंक सोडला तर!) समुद्रात बांधलेला ब्रिज आहे.
मोठ्या जहाजांसाठी हा ब्रिज वर उचलल्या जाऊ शकतो.

आता आलंच रामेश्वरम म्हणता म्हणता ११ ला पोहोचलो.. ही बस सोडते तिथुन लगेच ५/- मध्ये दुसरी बस पार मंदिराच्या दारात सोडते. पळत पळत मंदिर गाठले तर कळाले की मंदिर १२-३ नाही तर १-३ बंद असते.. आधी तर हे ऐकुन बरं वाटलं.. पण आत शिरल्यावरचा भुलभुलैय्या पाहुन १ पर्यंत तरी तो रामेश्वर दिसेल का अशी शंका वाटु लागली...



* आंतरजालावरुन साभार (http://scriptures.ru/india/tamilnadu/rameshwaram/rameshwaram347.jpg)

हे एक भव्य मंदिर आहे.. वरच्या फोटोत दाखवल्या प्रमाणे सर्वात मोठा कॉरिडॉर(?) असणारे हे मंदिर आहे. १२ ज्योतिर्लिंग आणि चार धामांपैकी एक असे हे मंदिर आहे सुद्धा तितकेच सुंदर! आत जायला दोन प्रवेशद्वार आहेत. ह्या मंदिरात रामेश्वराचे मंदिर तर आहेच, शिवाय पार्वतीमातेचेही एक मंदीर आहे. आत गेल्यावर २२ पवित्र विहिरींमध्ये डुबक्या मारायच्या आणि तशाच ओलेत्या अंगाने मुख्य मंदिरात जायचे. आम्ही काही ते केलं नाही.. हे मंदिरातले एक मोठे कुंड..



रामेश्वरममध्ये रामायणातल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या नावाने कुंड आहे.. राम, लक्ष्मण, सीता.. अगदी जटायु सुद्धा.. मला अजिबात नावं लक्षात नाहीत. पण तिथल्या एखाद्या रिक्षावाल्यासोबत डिल केलं की तो १ दिवसात सगळं फिरवुन आणतो.. मी जर काही नावं खाली वर केली तर समजुन घ्या.

इतक्या धावपळीनंतर जेव्हा आपण फक्त तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात रामेश्वराला चालु असलेला अभिषेक आणि आरती पहातो तेव्हा सगळी दगदग विसरायला होते! तामिळनाडुच हे एक आहे. माझ्या सारखे देवावर विश्वास न ठेवणारे लोकही इथली मंदिरं पाहुन भारावुन जात असावेत.. एक तर भव्यता.. स्वच्छता.. आणि सर्वात सुंदर म्हणजे केवळ दिव्यांच्या प्रकाशात दिसणारा देव! ज्या कुणी अनाम कलाकारांनी ही मंदिरं घडवायला जीव ओतला असेल त्यांना मनोमन दंडवत घातला! 

दर्शन झालं.. नॉर्मली लोक मग नाहेर पडतात आणि पुढच्या रस्त्याला लागतात.. पण अर्थातच तसे काही आमचे योग नव्हते.. आमच्या समोर लाईन मध्ये लागलेला दिर आणि नवरा अर्धा तास झाला तरी येईनात म्हणुन शेवटी पुढच्या मंदिरात असतील अशा विचाराने आम्ही पार्वतीच्या मंदिरात गेलो.. मग अजुन पुढच्या... करत करत संपलं सगळं पाहुन.. तरी हे बंधु गायब.. भुकेनी आता उपस्थिती जाणवुन द्यायला सुरवात केली होतीच.. साबांचा पारा भयंकर चढला होता.. पार अगदी मंदिरा बाहेर जाउन शोधुन आलो.. आधी मनाला भावलेली मंदिराची भव्यता आता डोक्यात जाउ लागली..!! सरते शेवटी जोडगळी डुलत डुलत येताना दिसली.. "दिसला नाहीत.. म्हणलं असालच इथे कुठेतरी..." असं थंड आवाजात बंधु "काय मग कसं काय?" च्या चालीत बोलले.. बर थंड अशासाठी की भिजुन आले होते.. म्हणजे कुठल्या तरी कुंडात डुबक्या मारत बसले असणार.. वर "आता काही बोलु नका.. आम्ही चुकलो बिकलो असलो तरी कुंडात डुबकी मारली आहे.. त्यामुळे सगळे हिशोब निल आहेत.." हे म्हणुन आम्हालाच गप्प केलं..

मग हे सगळं बारदान घेऊन जेवणाची शोधाशोध केली.. मंदिराबाहेरच ७०-८०/- मध्ये उत्तम थाळी (म्हण्जे भात + सांबार + इतर क्षुद्र पदार्थ) पोळी बिळी मागायची नाही. केळीच्या पानावर दणादणा भात वाढत रहातात.. आणि आजुबाजुला पाहुन आपण गोळे करुन हाणत रहायचं असा कार्यक्रम असतो..! आमच्या मते आम्ही १ क्विंटल भात संपवल्यावर जेव्हा हात वर केले तेव्हा वेटरच्या मते आम्ही जेवलोच नव्हतो..!

आता मात्र वेध लागले होते "धनुषकोडी"चे.. तसल्या वातावरणात सुर्योदय काही बघायला मिळणार नव्हताच.. पण किमान जास्तीत जास्त वेळ तिथे घालवायला मिळावा म्हणुन आम्ही धडपडत होतो.. रामेश्वरम मध्ये ५ जण बसतील अशा मोठ्या रिक्षा असतात. त्या ४००-५००/- मध्ये महत्वाची ठिकाणं दाखवुन आणतात. असाच एक रिक्षावाला आम्ही पकडला. त्याला म्हणलं आधी "धनुषकोडी".. मग वेळ उरला तर बाकीचं... पण "उरलेलं बाकीचं" बद्दल सांगायला मला काही मुळात लक्षातच नाहीये त्यामुळे रामेश्वरम मधल्या काही मह्त्वाच्या जागांचे फोटो देऊन ठेवते.

कोदंडधारी रामाचे मंदिर



हनुमान मंदिर



हे काय होतं ते मला कळलं नाही



गुगलमध्ये जे बिभीषण मंदिर म्हणुन दिसते ते मंदिर. धनुषकोडीला जाताना मध्येच एक रस्ता डावीकडे जातो. त्या रस्त्याचा शेवट म्हणजे हे मंदिर आहे.





धनुषकोडी बीच वरील मंदिर







धनुषकोडीला जायची गंमत अशी आहे की ह्या रिक्षा तुम्हाला फक्त धनुषकोडी बीच पर्यंत नेतात. पण तो काही भारताचा शेवट नव्हे. तिथुन पुढे ३ किमी वर साधारण पणे भारताचे शेवटचे टोक आहे. पण तिथे रस्ता जात नाही. तिथे जायला मिनीबस सारख्या गाड्या आहेत. दुसरा काहिही पर्याय नसल्याने काहीच्या काही पैसे मागतात. (साधारण १००-२००/- माणशी) त्यांना एका ट्रिपचे जे काही पैसे अपेक्षित असतील तेवढे मिळाल्याशिवाय गाडी हलत नाही.



परत आभाळ भरुन यायला लागलं होतं.. आम्ही थोडेच लोक होतो.. त्यामुळे माणशी जास्त पैसे दिले तर गाडी हलेल म्हणे.
न देउन सांगतोय कुणाला...! नक्की आहे तरी काय पुढे ह्याची उत्सुकता घेऊन त्या गाडीत बसलो...

धनुषकोडी



* आंतरजालावरुन साभार (http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/f/ff/Final_Dhanush_002.jpg)

धनुषकोडी हे भारताचे एक टोक आहे. पण केवळ तितकेच नाही.. पुर्वी इथे एक रेल्वे स्टेशनही होते. छोटेसे गाव होते. वस्ती होती.. १९६४ साली.. २२ डिसेंबरला आलेल्या एका मोठ्या चक्रीवादळात हे गाव वाहुन गेले.. नुसतेच गाव नाही तर पंबन वरुन आलेली पॅसेंजर.. आतील ११० प्रवासी आणि ५ कर्मचार्‍यां सकट एका मोठ्या लाटेने ओढुन नेली.. ह्या वादळात पंबन ब्रिजचेही नुकसान झाले.. त्यानंतर हे गाव "घोस्ट टाऊन" म्हणुन ओळखले जाऊ लागले. आता इथे कुणाचीही वस्ती नाही.. फक्त मासेमारांच्या तुरळक झोपड्या दिसतात..

जशी गाडी डांबरी रस्ता सोडुन रेतीमध्ये घुसली तसं समजलं की का हे लोक इतके पैसे घेत आहेत.. रेतीमध्ये गाडी वेड्यासारखे हेलकावे खात होती. आधीच्या ज्या गाड्या गेल्या होत्या त्यांच्या टायर प्रिंटवरुनच गाडी न्यायची.. क्षणोक्षणी वाटत होतं की आता ही गाडी उलटणार.. पण ड्रायव्हर अण्णा एकदम निवांत होते.. इनके खुन मे रजनीकांत दौडता होगा!





आजुबाजुला फक्त समुद्री वनस्पती.. पक्षी.. लाटांच्या पाण्यानी झालेला फेस.. आणि आता हा शेवट आलाच म्हणता म्हणता दिसत रहाणारे जमिनीचे तुकडे..







जागोजागी धनुषकोडीमधले भग्नावषेश दिसत रहातात. इथेले रेल्वे स्टेशन.. चर्च इ. इमारतींचे हे अवषेश..












धनुषकोडीमध्ये म्हणलं तर बघायला काहीही नाही.. ना चमचमती रेती.. ना स्वच्छ समुद्र.. ना नितळ पाणी.. ना हिरवीगार झाडी.. ना डोळे दिपतील अशा वास्तु... एक वेगळंच वातावरण आहे तिथे... अशा काहीही नसलेल्या ठिकाणी सुद्धा लोकांच्या झोपड्या आहेत..



मऊ मऊ रेतीत चालावं म्हणलं तर सर्वत्र पसरलेली काटेरी  झाडी आहेत..





आणि तरीही... इथुन जाऊच नये असं वाटावं असं काहीतरी तिथे आहे... एक चिरंतन शांतता इथे रहात असावी... त्या चक्रीवादळापुर्वी ह्या जागेत किती मानवी भाव भावना नांदल्या असतील.. किती आवाज ह्या समुद्राने ऐकले असतील.. लहान मुलाच खिदळणं असेल किंवा निरोपाचे हुंदके असतील.. बांगड्यांची नाजुक किणकिण असेल किंवा रेल्वेची कर्कश्श शिट्टी असेल... काहीच किलोमीटरवर असलेल्या रामेश्वरम सारखी लगबग इथेही होत असेल.. ही लगबग पोटात घेऊन गाडी झुक्झुक करत येत असेल...

आणि अचानक... एक लाट... हे सगळं पोटात घेउन गेली असेल...
..केवळ माणसं किंवा रेल्वेच नाही... तर इथला आवाज... इथल्या भावभावना... सगळंच...

मागे आक्रंदायलाही कुणी शिल्लक राहिलं नाही... एका क्षणात सगळं शांत....



पण तरीही ही स्मशान शांतता नाही... ह्या नीरव वातावरणाला कोणताही भावच नाही... सगळं बोलणं.. वाटणं.. समजणं... जिथे संपुन जातं.. आणि मग जे उरतं.. ते...

.....काहीच नसलेपण....



.... फक्त.... शांssतता....


क्रमशः

No comments:

Post a Comment